Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

कॉल ड्रॉप टाळण्यासाठी आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचे संशोधन, ‘वायरलेस’ मानके निश्चित

मुंबई : तुम्ही मोबाइलवर बोलत असताना फोरजी एलटीई नेटवर्क असते आणि अचानक ते थ्रीजी किंवा टूजी होते. त्यानंतर आवाजाचा दर्जा खालावतो किंवा ‘कॉलड्रॉप’ होतो. जर तुम्ही इंटरनेट कॉलवर असाल तर फोरजीवरून कॉल थ्रीजीवर आल्यास ‘रिकनेक्टिंग’ची सूचना येते. मात्र यापुढे हा त्रास दूर होणार आहे. वायरलेस तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एसडीएन’चे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आणि सध्या आयआयटी कानपूरचे संचालक असलेल्या प्रा. डॉ. अभय करंदीकर यांच्या टीमने संशोधन केले असून त्याला नुकतीच जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. यामुळे ‘वायरलेस’ क्षेत्रासाठी नवीन मानक निश्चित झाले आहे. भारतात संशोधन झालेले इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील हे पहिले मानक असल्याचे डॉ. करंदीकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

उद्योग क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट समान दर्जाची असावी, या उद्देशाने विशिष्ट मानके निश्चित केली जातात. याचप्रमाणे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठीही जागतिक स्तरावर विविध विषयांवर मानके निश्चित करण्यासाठी न्यूयॉर्क येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स’ (आयईईई) ही संस्था काम करते. या संस्थेने आतापर्यंत वायफाय, ब्लू टूथ यासह या क्षेत्रातील अन्य हजारांहून अधिक मानके निश्चित केलेली आहेत. या मानकांनुसार जगभरात या यंत्रणा काम करत असतात. दूरसंचार क्षेत्रामध्ये नेटवर्क बदलताना अनेक अडचणी येत होत्या. म्हणजे आज आपण ‘फाइव्ह जी’ची प्रतीक्षा करत आहोत. मात्र ‘फाइव्ह जी’ आले तरी ज्या भागात ती सुविधा उपलब्ध नसेल अशा भागात कॉल ‘फोर जी’ मग ‘थ्रीजी’ अशा खालच्या पर्यायामध्ये जात असतो. हा प्रवास होताना अनेकदा ‘कॉल ड्रॉप’ होण्याच्या तक्रारी येतात. जगभरातील दूरसंचार क्षेत्रात हे टाळण्यासाठी एक प्रमाणित पद्धती आवश्यक होती. प्रा. करंदीकर हे आयआयटी मुंबईमध्ये असताना २०१६-१७मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली या पद्धतीवर संशोधन सुरू करण्यात आले. पाच वर्षांच्या संशोधनानंतर मिडलवेअरवर आधारित वायरलेस नेटवर्क नियंत्रित करणारी ‘सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग’ प्रणाली विकसित करण्यात आली. यानुसार आता कंपन्यांना सुलभगतीने ‘फ्रिक्व्हेन्सी बदल’ करता येणे शक्य होणार आहे. तसेच ग्राहकांना हे बदल होत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. याच्या जागतिक पातळीवर विविध स्तरांवर चाचण्या झाल्यानंतर नुकतीच ‘आयईईई’ने या संशोधनाला मान्यता दिली. आता ही प्रणाली जगभरासाठी निश्चित करण्याचे ठरविले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणीही सुरू होणार आहे.

भारतीय संशोधनाचे महत्त्व

जागतिक पातळीवर आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार क्षेत्रात अनेक मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्याचा वापर आपण सध्या करत आहोत. मात्र ‘वायरलेस’चे हे मानक पूर्णपणे भारतात संशोधन करून निश्चित करण्यात आलेले पहिलेच मानक असल्याचे प्रा. करंदीकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. याचा फायदा अब्जावधी मोबाइलधारकांना होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर ‘फाइव्ह जी नेटवर्क’ देशातील ग्रामीण भागात पोहोचावे, यासाठी ‘फ्रूगल फाइव्ह जी’वर संशोधन सुरू आहे. सध्या फाइव्ह जीचे नेटवर्क हे ५०० किमी प्रतितास प्रवास करताना किती प्रभावीपणे काम करू शकते, यावर चाचण्या झाल्या आहेत. मात्र भारतातील ग्रामीण भागात कमी फ्रिक्व्हेन्सीच्या भागातही हे नेटवर्क कसे काम करू शकते, याचे हे संशोधन आहे. याचेही मानक तयार करण्यात आले असून त्यालाही वर्षाअखेरपर्यंत ‘आयईईई’ची मान्यता मिळू शकेल, असा विश्वास प्रा. करंदीकर यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button