breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

Pune | लोकसभा निवडणुकीसाठी ४७ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक

येत्या १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

पुणे | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाने आतापासूनच आवश्यक तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४७ हजारापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी सविस्तर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची नियमावली, घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण ४७ हजार ३५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा    –    छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी 

जिल्ह्यातील एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ याप्रमाणे ३३ हजार ५२८ मतदान कर्मचारी असतील. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यात येणाऱ्या ३ विधानसभा मतदारसंघात १ हजार ३३९ मतदान केंद्रांसाठी ५ हजार ३५६, पुणे २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ८ हजार ७२, बारामती २ हजार ५१६ मतदान केंद्रासाठी १० हजार ६४ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी १० हजार ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळसाठी १ हजार ६०७, पुणे २ हजार ४२२, बारामती ३ हजार १९ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ११ याप्रमाणे प्रत्येकी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याशिवाय चारही मतदारसंघ मिळून ३ हजार ७७३ कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. मतदानाच्यावेळी आवश्यकतेनुसार या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ४० टक्के महिला कर्मचारी असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे लोकसभा मतदारसंघ स्तरावर यादृच्छीकीकरण करून त्यांना मतदान केंद्रावर नेमण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची नीट माहिती करून द्यावी आणि निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button