breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाबळेश्वर, वाई तालुक्यात अतिवृष्टीबाधित शेतीची पुनर्बाधणी

महाबळेश्वर |

महाबळेश्वर आणि वाई तालुक्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पूर्णत: बाधित झालेल्या ११७ गावांतील शेतीच्या पुनर्बाधणीचे काम आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा व वाई तालुका जेसीबी असोसिएशन आणि सातारा प्रशासनाच्या संयुक्त मदतीतून सुरू झाले आहे. २२ आणि २३ जुलै रोजी महाबळेश्वर,वाई, जावळी, पाटण तालुक्यांत अतिवृष्टीने अनेक गावांना फटका बसला. यामध्ये १५८० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. आजही अनेक गावांत मदत पोहोचलेली नाही. या वेळी महाबळेश्वर येथील ८५ व वाईतील ३२ गावांतील शेतीचे मोठे नुकसान पावसाने झाले होते. काही गावांत शेती पूर्णत: वाहून गेली तर काही ठिकाणी शेती नापीक होण्याची झाली. पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून गेली. शेती पूर्णपणे नापीक झाली. दरडी कोसळून शेतात आल्या. मोठमोठे दगड शेतात आले. पावसाने अनेक घरे आणि शेती माणसे वाहून गेली. काही माणसे कशीबशी वाचली. वाहून गेलेली माणसे आजपर्यंत सापडलेली नाहीत.

या परिसरात फारच तुटपुंजी शेती आहे. परंतु शेतीच गेल्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. शेतीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्यांच्या शेतात आत्ता फक्त दगड, रेती, मुरूम, झाडांचे वाहून आलेले ओंडके आहेत. जेथे नाल्याची ओढा म्हणून ओळख होती ते दहा फुटांचे ओढे या अतिवृष्टीने शंभर फुटांचे झाले आहेत. तेही दगड, वाळू, मुरूम, माती, झाडे, लाकडाच्या ओंडक्यांनी भरले आहेत. अतिवृष्टीने अनेक गावांतील शेतजमिनी, रस्ते वाहून गेले आहेत. नाल्यांनीही आपले पात्र बदलले आहे. गावांना जोडणारे रस्ते पूल, साकव तुटले आणि ओढय़ांच्या व नाल्यांच्या काठावरील शेती पूर्णपणे वाहून गेली. कितीही खर्च आणि कष्ट करून ही शेती पूर्वपदावर येऊ शकणार नाही, असे शेतकऱ्यांनी गृहीत धरले होते. मात्र अशा परिस्थितीत आमदार मकरंद पाटील यांनी त्यांना आधार दिला.

मी तुमची शेती दुरुस्त करून देणारच असा शब्द त्यांनी दिला होता. शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि पुनर्बाधणीसाठी आमदार पाटील सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांनी मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोचवल्या होत्या. परंतु मदत मिळण्यात अडचणी येत राहिल्या. पुढील शेती हंगामापर्यंत शेती दुरुस्त करणे गरजेचे असल्याने आमदार पाटील यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन खंडाळा आणि वाई तालुका जेसीबी असोसिएशनशी संपर्क साधला. आपल्याला शेतीच्या पुनर्बाधणीचे काम मोफत करावयाचे असल्याचे सर्वाच्या गळी उतरविले. या असोसिएशनने याला मान्यता दिल्यानंतर आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी चर्चा केली. आमदार पाटील यांनी ही सर्व यंत्रणा मोफत मिळवली असून यासाठीच्या इंधनाचा खर्च मात्र जिल्हा नियोजन मंडळातून करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे.

आमदार मकरंद पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याने आणि ते प्रत्यक्षात येत असल्याचे दिसल्याने सर्वाची मोट बांधून दुरुस्ती मोहीम सुरू झाल्याने लोकांनी आशा सोडलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अनेक गावांत यंत्रांना उतरण्यासाठी रस्ता नाही, कारण रस्तेही वाहून गेले आहेत. जिथे थर मिळेल अशा जागेत जेसीबी उतरून काम कुठून करायचे काय करायचे याची गावपातळीवर ग्रामस्थांना बरोबर घेऊन नियोजन करण्यात आले. पूर्ण शेतीच वाहून गेलेली असल्यामुळे बांध कुठे घालायचा आणि संपवायचा कुठे, कोणाच्या हद्दी कुठपर्यंत आहेत याचीही अडचण निर्माण झाली होती. सगळेच वाहून गेल्यामुळे बांध हद्द आता राहिली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. परंतु अडचण बाजूला सारत लोकांनीही शेती दुरुस्त करून घेण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे बांधावरून भांडत बसण्याची ही वेळ नाही हे त्यांना कळून चुकले आहे. बांध कुठेही असला तरी तो सावरून घेण्याची आवश्यकता आहे, याची जाणीव झाल्याने त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या आवाहनाला साद देत सहकार्याची भूमिका घेतली.

दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्यानंतर पहिला दिवस वाटा करण्यात गेला आणि आता यंत्रणा १५ दिवसांपासून अविरत काम करत आहे. यंत्रांच्या मदतीने शेती आणि शेतकरी सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वानी हिमतीने ओढय़ाला बांध घातला आहे. माती ओढून शेतात घेतली जात आहे. जेथे शक्य आहे तेथे दगडाचे बांध घातले जात आहेत. ही मोहीम पुढील १५ दिवस सुरू राहणार आहे. साधारण जून-जुलै महिन्यात या भागात भात लागवडीची लगबग सुरू होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भातशेती करता यावी याकरिता त्यांना शेत तयार करून देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी तत्कालीन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना बरोबर घेऊन केली होती. यानंतर जिल्हाधिकारी शेखरसिंह व प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीही पाहणी केली होती. यंत्रणेद्वारे गावागावांत जाऊन नुकसान झालेल्या शेतीच्या पुनर्बाधणीचे काम आमदार पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. या वेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सुषमा पाटील, रणजीत भोसले आदी प्रशासकीय अधिकारी सहभागी आहेत.

  • खचलेल्या मनांना आधार

यंदाच्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर आणि वाई तालुक्यावर मोठे संकट ओढवले होते. २२ जुलै रोजी एक हजार ते बाराशे मिलिमीटर एवढा भरमसाट पाऊस या भागात पडला. लोकांचे होते नव्हते ते सगळे वाहून गेले. दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले. लोकांच्या मदतीला जावे तर रस्तेही नाहीसे झाले होते. महाबळेश्वर आणि वाई तालुक्यांत अनेक गावे कितीतरी दिवस संपर्कहीन होती. राज्याचा आणि या भागाचा संपर्कच तुटला होता. तरीही रस्ता काढत मी आणि सरकारी यंत्रणा तेथे पोहोचलो. काय हवेनको ते विचारले आणि खचलेल्या लोकांना आधार दिला.

प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन उद्धवस्त शेतीचे सर्वेक्षण केले. लोक कसे उभे राहतील? काय केले पाहिजे त्याचे नियोजन केले. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांतून घर उभारणीसाठी मदत केली. पण उदरनिर्वाहासाठी शेती दुरुस्ती शिवाय पर्याय नव्हता. यासाठी सर्वाना बरोबर घेऊन शेती दुरुस्तीचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसहभाग, स्थानिक प्रशासन यांच्या मदतीने एक मोठे निर्माणकार्य सुरू आहे.

  • मकरंद पाटील, आमदार, वाई

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button