breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

कवितेतील पाऊस कवींच्या प्रतिभेचे लेणे: रघुनाथ पाटील

पिंपरी :  “कवितेतील पाऊस कवीच्या प्रतिभेचे लेणे घेऊन जन्माला आलेला असतो. म्हणूनच तो अतिशय विलोभनीय भासतो. श्रोत्यांना बंदिस्त सभागृहात आनंदाच्या वर्षावात चिंब करण्याचे सामर्थ्य या अनोख्या पावसात असते.” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार रघुनाथ पाटील यांनी केले. शनिवार २३ जुलै रोजी पैस रंगमंच चिंचवड येथे स्वयंसिद्धा प्रतिष्ठान तर्फे आषाढ काव्यधारा कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात रघुनाथ पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कवयित्री छायाताई कांकरिया, स्वयंसिध्दाच्या अध्यक्षा सविता इंगळे, स्वयंसिद्धाचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कार्यवाह समृद्धी सुर्वे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रघुनाथ पाटील पुढे म्हणाले, “कविता काळजातून आली की, ती रसिकांच्या मनाचा अचूक ठाव घेत असते. प्रत्येकाच्या जाणिवा, जीवनानुभव वेगवेगळ्या प्रकारे कवितेतून शब्दबद्ध होत असतो. म्हणूनच एकाच विषयावरील दोन कविता कधीच एकसारख्या नसतात. पाऊस सगळीकडे सारखाच पडत असतो. पण कविता मात्र वैविध्यपूर्ण असतात.” कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या छायाताई कांकरिया आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “प्रत्येक कविता ही सुंदर असते. कारण कवींनी ती अतिशय तन्मयतेने आणि काळाजातून सादर केलेली असते.” असे सांगून त्यांनी दोहा आणि पावसावरची कविता सादर केली.

या कविसंमेलनाला खुद्द पावसानेही हजेरी लावली. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आयोजित आषाढ काव्यधारा या कवीसंमेलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. या वेळी पिंपरी चिंचवड, पुणे, पुण्याच्या इतर भागातून व बाहेर गावाहून कवी आले होते. अडीच तास हे कवी संमेलन रंगले. कवींच्या एकाहून एक सरस अशा कविता आणि रसिकांची दाद यामुळे कार्यक्रम खूप उंचीवर गेला.

या कविसंमेलनात मेहमूद शेख यांनी, आपल्या कवितेतून, “नित्य आषाढ मासात वारी जाई ती पंढरी विठू रायाचे दर्शन हिच आस माझे उरी” असे सांगितले. तर माधुरी गयावळ यांनी, “वेदनांना जोजवत नाव देते. जाई, जुई, चाफा,मोगरा, चमेली कधी काटेसावर कधी बाभळी किंवा कधी रानफुलं म्हणते.” अशी आशयपूर्ण कविता सादर केली. सौ.कविता काळवीट यांनी,
“हलकीशी सर भिजवून जाते माती किंचित ओलीओली चित्र मनोहर पहात जाता सहल, मुग्ध सकाळी झाली.” असे कवितेतून सांगितले. अनिसा सिकंदर यांनी, “माझिया माहेराची नागमोडी वाट वाहतो पाण्याचा भला मोठा पाट” असे कवितेतून सांगत माहेरच्या आठवणी जाग्या केल्या. अशोक सोनवणे यांनी, “तुझ्या नयनांची भेट झाली
आशा ,आनंदाची कळी फुलून गेली” अशा बहारदार ओळी सादर केल्या. सुरेश कंक यांनी ‘आषाढसरी’ ही कविता गायली. या कवितेवर रसिकांनी ताल धरला. प्रशांत पोरे यांची ‘तुझी आठवण उगाच येते’ या गझलेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. शोभाताई जोशी यांची, ‘बालपण दे’ ही कविता रसिकांना विशेष भावली रजनी आहेरराव यांची ‘भूक मैत्रिण’, भावना क्षिरसागर – ‘आषाढसरी’, तानाजी एकोंडे – ‘येथे ओशाळला मृत्यू’, आत्माराम हारे – ‘गजरा’, वंदना इन्नाणी – ‘कसे विसरू’, आशाताई घुटे- ‘निसर्ग गीत’, कैलास भैरट – ‘येरे पावसा’, अभिजीत काळे- ‘एखाद्या आयुष्यावर’, राधाबाई वाघमारे – ‘आषाढ धारा’, योगिता पाखले-‘कोण आहे माझं’, हेमंत जोशी – ‘श्रीकृष्ण’, अरूण कांबळे – ‘तुका जगताचा बाप’, सुनिताताई टिल्लू – ‘आजकाल प्रेमाचे सौभाग्य’, नेहा चौधरी- ‘पाऊस’, जयश्रीताई श्रीखंडे – ‘सुंदर सृजन’, संदीप जाधव – ‘पावसाळा गझल’, नंदकुमार कांबळे – ‘भिजत राहू’, सीमा गांधी – ‘चैतन्याचे रंग’, सारिका माकोडे – ‘शिवार पंढरी’, अश्विनी मेहता – ‘तिचे अस्तित्व’, संजय जगताप – ‘पाऊस श्वासांची मैफील’, शामरावजी सरकाळे – ‘लोणावळा सहल’, फुलवती जगताप – ‘पाऊस’, सुप्रिया लिमये अशा असे एकूण पंचेचाळीस कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

या आषाढ काव्यधारा कविसंमेलनाला राज अहेरराव, राजेंद्र घावटे, डॉ. पी. एस. अगरवाल, अशोक गोरे, मुकेश चौधरी या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसिध्दाच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन समृद्धी सुर्वे यांनी केले. आभार नंदकुमार मुरडे यांनी मानले. आणि कार्यक्रमाचे संयोजन वर्षा बालगोपाल, अमृता ओंबाळे, प्रभाकर पवार, शरद काणेकर आणि स्नेहा इंगळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button