गांजा भरलेलं पोत घेऊन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
पुणे | पोत्यामध्ये गांजा भरून ते घेऊन विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 62 हजार रुपयांचा 13 किलो गांजा जप्त केला आहे. लोणीकंद परिसरात ही कारवाई करण्यात आली.नितीन मोहन डुकळे (वय 25, वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी वाघोली परिसरात गस्त घालत असताना त्यांना दुचाकीवरून संशयास्पदरीत्या जाणारी एक व्यक्ती दिसली. त्यांनी या व्यक्तीला थांबून त्याच्याकडे असणाऱ्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली.
लोणीकंद पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





