स्मार्ट सिटी सुरूच राहणार? एटीएमएसने दाखविली प्रकल्प चालविण्याची तयारी
पुणे : केंद्र शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्प बंद करणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी मार्च २०२५ पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही स्मार्ट सिटी सुरू राहणार असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेली एटीएमएस सिंग्नल यंत्रणेची जबाबदारी पुढील पाच वर्षे स्वीकारण्याची तयारी स्मार्ट सिटी प्रशासनाकडून दाखविण्यात आली आहे.
त्यासाठीचे पत्र नुकतेच महापालिकेस देण्यात आले असून, स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांंनी दिली.
स्मार्ट सिटी बंद होणार असल्याने हा प्रकल्प वाहतूक पोलिसांकडे हस्तांतरीत केला जाणार होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने तो महापालिकाच चालविणार असे चित्र होते. मात्र, आता स्मार्ट सिटीने पुढील पाच वर्षे त्याची जबाबदारी स्वीकारल्याने तो त्यांच्याकडेच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – चिंचवडच्या जनतेचे माझ्यावर ऋण; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
या प्रकल्पाअंतर्गत शहरातील १२४ चौकांमध्ये अत्याधुनिक सिंग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. वाहनांची वर्दळ आणि वाहतुकीचा वेग लक्षात घेऊन ही यंत्रणा शहरातील सर्व सिंग्नलचे नियंत्रण करते. या प्रकल्पासाठी सुमारे १०२ कोटींचा खर्च करण्यात आला असून, ही यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीस प्रत्येक वर्षासाठी ११ कोटींचा देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिका देणार आहे. त्यानुसार महापालिकेने हा खर्च स्मार्ट सिटीला द्यावा. त्यानुसार कंपनीस हे पैसे दिले जातील, असे महापालिकेस कळविण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच या यंत्रणेबाबत पोलीस आयुक्तांकडून महापालिकेस पत्र पाठविण्यात आले असून, संबंधित कंपनीस महापालिकेकडून पैसे देताना पोलिसांचे उपयुक्तता प्रमाणपत्र घेण्यात यावे, त्यानंतरच पैसे द्यावेत, असे नमूद केले आहे. मात्र, त्याची गरज नसल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले. करार महापालिका आणि कंपनीत असून, पोलिसांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.