राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नेमके काय?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-2024-12-27T130939.855-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीबाबत अद्यापही शिक्षण क्षेत्रातील घटकांना प्रश्न अथवा शंका आहेत. त्या पार्श्वभूमीवर या शंकाचे निरसन करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील प्रश्न, शंका ऑनलाइन पद्धतीने विचारण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
राज्यात स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. राज्य सरकारच्या सुचनेनुसार राज्यातील सर्व विद्यापीठांनी एनईपीसंदर्भात प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या. त्याचप्रमाणे “एनईपी’ची अंमलबजावणी कशी करावी, यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली “एनईपी’ अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापना करण्यात आली. डॉ. करमळकर यांनी विद्यापीठनिहाय बैठका घेऊन मार्गदर्शन केले.
हेही वाचा – छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर
त्यानंतरही “एनईपी’ अंमलबाजवणीत प्राचार्य, प्राध्यापकांबाबत विविध प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाने ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून “एनईपी’बाबतच्या शंकांचे निरसन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने प्राध्यापकांना तंत्रशिक्षण; तसेच उच्चशिक्षण संचालकांनाही प्रश्न विचारता येणार आहेत. उच्च शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी, तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष, सदस्य हे एनईपी संदर्भातील विविध प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सर्वांसाठी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमाची सुरूवात शनिवार (४ जानेवारी)या दिवशी होणार आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने https://zoom.us/i/99562255769 या लिंकवर इच्छुक प्राध्यापक, विद्यार्थ्यांना एनईपी संदर्भातील त्यांचे प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.