ताज्या घडामोडीपुणे

पाणीप्रश्न पेटला! ‘धरणे भरूनही घशाला कोरड’, पुणेकरांची टँकरच्या पाण्यावर भिस्त

पुणे |  पुण्याच्या आजुबाजूला २६ धरणे असल्याने पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. गेल्या पावसाळ्यात ही धरणे तुडुंब भरली असली तरीही जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अंदाजे ५४ हजार ६१४ नागरिकांची तहान टँकरने भागविली जात असून पुणेकरांना आत्तापासूनच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीगळती आणि पाणीचोरी हे यामागील प्रमुख कारण असून गळती आणि चोरीचा मुख्य केंद्रबिंदू मुठा उजवा कालवा आहे.

पुण्यात समाविष्ट नवीन गावांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे. या भागातील नागरिकांना अंदाजे ८०० ते एक हजार रुपयांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीगळती या परिस्थितीमागील प्रमुख कारण आहे. आत्तापर्यंत पुणे महापालिकेकडून कालव्यातून बेसुमार पाणी उपसा करण्यात येत असल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याचा आरोप जलसंपदा विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते पुणे कँटोन्मेंटपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आल्यावर महापालिकेकडून कालव्याद्वारे पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून शेतीला आणि पिण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुठा उजवा कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यात बेकायदा पंप टाकून पाणीचोरी करण्यात येते. कालव्याजवळ विहिरी खोदून त्याद्वारेही पाणीचोरी केली जाते. तेच पाणी टँकरने विकले जाते. या व्यवहारातून ‘टँकरमाफिया’ पाण्यासारखा पैसा कमावित आहेत.

दोन टीएमसी पाणी कमी…

पुणे शहरासाठी पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही 4 धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. ही धरणे गेल्या पावसाळ्यात १०० टक्के भरली. त्यामुळे यंदा पुण्यावर पाणीकपातीची वेळ येणार नाही, अशी हमी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात जलसंपदा विभागाने मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचे कारण दाखवून धरणे रिकामी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे यंदा अवघे १०.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टीएमसी पाणी धरणांमध्ये कमी आहे. गेल्या वर्षी १२.७१ टीएमसी पाणी होते.

२८ टँकरने पाणीपुरवठा…

पाण्याचा साठा कमी होत चालला असताना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या तालुक्यांतील सुमारे ५४ हजार ६१४ नागरिक पाण्याविना तहानलेले आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी २८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २० गावे आणि १५२ वाड्यांमध्ये पाणीप्रश्नाने भीषण रूप धारण केले आहे.

सातारा, सांगलीतही टँकर…

पुणे विभागातील पुण्यासह सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. साताऱ्यात ४ हजार ११० नागरिकांना टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. सांगलीत १ हजार २०० लोकांना पाण्यासाठी दाही दिशा हिंडावे लागत आहेत. सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button