संवेदनशील १२ मतदारसंघांवर वॉच; गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/शंकर-जगताप-2-780x470.jpg)
पुणे : जिल्ह्यातील २१ पैकी १२ विधानसभा मतदारसंघांतील गैरप्रकारांना रोखण्यासाठी स्थिर आणि भरारी सर्वेक्षण पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुभव लक्षात घेऊन रोख रक्कम, मद्य, तसेच मौल्यवान वस्तूंच्या जप्तीचे सर्वात जास्त प्रमाण असणाऱ्या १२ मतदारसंघांवर निवडणूक निरीक्षकांनी करडी नजर राहणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये या पथकांत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीवेळी रोख रक्कम, तसेच मद्य वाटपाचे गैरप्रकार घडले होते. त्याबाबत निवडणूक खर्चाच्या निरीक्षकांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.
हेही वाचा – माहीममध्ये महायुतीचा निर्णय काय? अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
त्यामध्ये जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी जिल्ह्यातील खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, पिंपरी, चिंचवड, शिवाजीनगर, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट या १२ मतदारसंघांमध्ये रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थांसह भेटवस्तू वाटपाचे प्रमाण, तसेच उमेदवारी खर्चांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करण्याचे आदेश निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.
जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी तीन स्थिर, तसेच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच या मतदारसंघांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तैनात करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.