माहीममध्ये महायुतीचा निर्णय काय? अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..

मुंबई | महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप निश्चित झालं आहे. यासह सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४ नोव्हेंबरला उमदेवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर आणि अमित ठाकरे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मनसेला पाठिंबा देण्यास विरोध केल्याने येथे बहुरंगी लढत होणार आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राज ठाकरे लोकसभेत आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर माझी चर्चाही झाली होती. त्यांची काय रणनीती आहे हे मी त्यांना विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) होऊद्या. मग ठरवू. पण त्यांनी थेट उमेदवारच जाहीर केला. आता (माहीम विधानसभा मतदारसंघातून) आमचेही आमदार आहेत. ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशीही मी चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते फार आक्रमक असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर
कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे, हेही नेत्याचं काम असतं. त्यामुळे आजच्या तारखेला आमची शिवेसना (एकनाथ शिंदे), भाजपा आणि एनसीपी (अजित पवार) यांची महायुती आहे. याच महायुतीत आम्ही निवडणूक लढवत आहोत. तसंच, आरपीआय, जनसुराज्य असे लहान पक्ष सोबतीला असून आम्ही बहुमत मिळवू, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.





