‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा राज्यभर उपक्रम

पुणे : तरुण पिढी वाचनापासून दुरावत चालली आहे. या पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर पुस्तक वाचनाकडे वळतील, असे उच्च शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
नव्या वर्षात राज्यातील ४५ लाख विद्यार्थी पुस्तके वाचून त्यांचे परिक्षण लिहिणार आहेत. १ ते १५ जानेवारी या कालावधीत हा वाचन पंधरवडा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पुस्तक परिक्षण आणि कथन स्पर्धा राबवावी लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याने वाचलेल्या आवडीच्या पुस्तकातील परिक्षण लिहून द्यावे लागणार आहेत. हे परिक्षण ५०० शब्दांचे असावे किंवा त्याचे ५ मिनिटे कथन करावे. यातील ३ उत्कृष्ट परिक्षणांची निवड करून त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाणार आहे, असेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – ‘बीआरटी’तील घुसखोरी ३९ हजार चालकांना भोवली; ११ महिन्यांत ३ कोटी ७१ लाखाचा दंड वसूल
तरुणांना वाचनाकडे वळविण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यादृष्टीने कॉलेज, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सर्व कॉलेजेस, विद्यापीठे आणि सार्वजनिक ग्रंथालये यांना त्यांच्या संस्थेच्या प्रांगणात वाचनाचा सामूहिक उपक्रम राबविण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
या उपक्रमाची छायाचित्रे कॉलेजांना त्यांच्या संकेस्थळावर, स्थानिक वर्तमानपत्रात आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस देण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावीत आणि ती कशी वाचावीत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.





