नवमतदारांची मते ठरणार निर्णायक; १ लाख ६५ हजार २३९ मतदार वाढले

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत १८ ते १९ या वयोगटांतील मतदारांच्या संख्येत लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे ६९ हजार ९६४ ने वाढ झाली आहे. २० ते २९ या वयोगटांतील मतदार संख्येत १ लाख ६४ हजार ६५१ ने वाढ झाली आहे. १८ ते २९ या वयोगटांतील मतदार संख्येत एकूण २ लाख ३४ हजार ०९२ ने वाढ झाली असून, ही मते निर्णायक ठरणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीसाठी २३ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ७१ हजार ५८८ इतकी होती, तर एकूण मतदार संख्या ८१ लाख २७ हजार १९ इतकी होती. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत नवमतदारांची संख्येचे प्रमाण हे अवघे ०.८८ टक्के होते.
हेही वाचा – ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं’; अजित पवारांचं विधान
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाच्या दहा दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करण्यास आयोगाने मान्यता दिली. त्या कालवधीत नवमतदारांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या वयोगटातील मतदारांच्या संख्येत वाढ होऊन ती ९५ हजार २७५ इतकी झाली होती. ८ एप्रिल रोजी एकूण मतदार संख्या ८२ लाख ९२ हजार ९५१ इतकी झाली. तेव्हा एकूण मतदार संख्येमध्ये नवमतदारांची संख्या वाढून जवळपास १.७५ टक्के इतकी झाली होती.
जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर काही दिवसांतच आयोगाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आली होती. त्यानुसार मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत १८ ते १९ या वयोगटांतील मतदारांची संख्या १ लाख ६५ हजार २३९ एवढी झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारांच्या संख्येत जवळपास ६९ हजार ९६४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येच्या तुलनेत नवमतदारांची संख्येचे प्रमाण हे आता १.८८ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.




