वेदांताचार्य विठ्ठल महाराज धोंडे यांचा लोकरत्न पुरस्कारने सन्मान; वारकरी सांप्रदायातील योगदानामुळे गौरव

अमित शेळके | प्रतिनिधी
पुणे | शंकरभाऊ मांडेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भोर, राजगड, मुळशी आणि पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजात शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक आणि कला, क्रिडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ५१ जणांना हा लोकरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी वारकरी सांप्रदायासाठी अविरत कार्यरत असणारे ह.भ. प विठ्ठल महाराज धोंडे शास्त्री यांना लोकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
वारकरी सांप्रदायातील योगदान लक्षात घेता विठ्ठल महाराज धोंडे सन्मानित करण्यात आले आहे. विठ्ठल महाराजांच्या घरामध्ये वारकरी सांप्रदायाचा वसा, वारसा परंपरेने सुरु आहे. आपल्या विद्वत प्रचुर वाणीने सातत्याने संतसाहित्याचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करत असतात. अध्यात्मातील अवघड ज्ञान अगदी सोप्या भाषेत लोकांना समाजावून सांगण्याची शैली महाराजांकडे आहे. त्यामुळेच समाजाने त्यांना वेदांताचार्य ही पदवी बहाल केली आहे.
हेही वाचा – ‘लोकसभेत रस पिळून काढला म्हणून विधानसभेत रस नाही’; संजय राऊत यांचा अजित पवारांना टोला
विठ्ठल महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतले असून संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग हा पुढील पिढीला व्हावा या उद्देशाने आळंदी येथे गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदायाच्या शिक्षणाचे धडे देत आहे. संत सोपानकाका वारकरी शिक्षण संस्था असं या शिक्षण संस्थेचं नाव आहे. या संस्थेत अनेक विद्यार्थी घडले असून विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. भविष्यात सुसंस्कारित पिढी तयार होऊन भारतीय संस्कृतीचे जनत व्हावे याकरिता विठ्ठल महाराज धोंडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
मनुष्याने समाजामध्ये जर सद्हेतून आणि निष्कामवृत्तीने काम केलं तर त्याचे निश्चित फळ मनुष्याला मिळत असतं. हा पुरस्कार मिळाल्यामुळे उत्तरोत्तर वारकरी सांप्रदायाची सेवा करण्याचं बळ मिळते, असं विठ्ठल महाराज धोंडे शास्त्री यांनी सांगितले.