पुण्यात राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; ‘गुवाहाटी चले जाव’ची घोषणाबाजी
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका : आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवणार!
!['Traitor's Day' celebrated by NCP in Pune; The slogan of 'Go to Guwahati'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/NCP-Pune-780x470.jpg)
पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस साजरा करत आंदोलन करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळी करण्यात आली.
शहराध्य प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील जनतेने आज पर्यंतच्या ७५ वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत.पण एक वर्षापूर्वी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारसह बाहेर पडत बंड पुकारले. त्यानंतर सूरत,गुवाहाटी आणि गोवामार्गे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले आहे. हे बंड देशातील जनता कधीच विसरू शकणार नसून या बंडखोर आमदारांना ५० खोके दिल्याची चर्चा आहे. त्या घटनेचा आणि कृतीचा आम्ही अनोख्या प्रकारे निषेध नोंदवित आहे. तो म्हणजे गद्दार दिवस साजरा करित आहोत ” असेही जगताप यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदार,आमदारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रियाही यावेळी जगताप यांनी दिली.