गणेश मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुण्यातील काही मार्गात एक दिवसासाठी वाहतूकीत बदल
![To avoid rush and traffic congestion for buying Ganesha idols, the traffic police has changed the traffic on some roads in Pune for one day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/pune-traffic_main.jpg)
पुणे | गणेश मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुण्यातील काही मार्गात एक दिवसासाठी वाहतूकीत बदल केला आहे.यामध्ये अण्णा भाऊ साठे चौक, जिजामाता चौक, सिंहगड रोड, मुंढवा चौक या मार्गांचा समावेश असणार आहे. हे बदल आज (दि.30) आणि उद्या (दि.31) साठी असणार आहेत.
यामध्ये सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे.शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे.वाहन चालकांनी याला पर्याय म्हणून संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे, किंवा संचेती चौकाकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बर्वे चौकातून डावीकडे वळून न जाता सरळ जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक,टिळक रोड मार्गे जावे.तसेच झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळेपुल मार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून प्रिमीयर गॅरेज चौक शिवाजीपुल मार्गे गाडगीळ पुतळा चौक डावीकडे वळून घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच सिंहगड रोडवरील सावरकर पुतळा ते समाधन भेळ सेंटर या मार्गावर वाहतूक सुरु राहील, मात्र गाडी पार्क करता येणार नाही.
पार्कींगसाठी नागरिकांना मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला, निलायम ब्रीज ते सिंहगड रोड जंक्शन, न्या.रानडे पथावर कामगार पुतळा ते शिवाजी पुतळा या दरम्यान कोर्टाकडील एका बाजूस, वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याने, टिळक पुल ते भिडे पुल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर, मंडई येथील सतिश मिसाळ वाहनतळ व बाबु गेनु वाहनतळ, शाहू चौक ते राष्ट्रभुषण चौक येथे फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूला नागिकांना पार्कींग करता येणार आहे.
पार्कींगबरोबरच फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज,आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते माती चौक, तसेच सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मंगला टॉकीज समोरील प्रिमीयर गॅरेज लेनमधून खुडे चौक या मार्गावर वाहतूक सुरु असेल पण जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.
या मार्गावर एकेरी वाहतूक –
1) मुंढवा चौकाकडून शिवाजी चौक, केशवनगर येथे आल्यानंतर वाहनचालकांनी मांजरी रोडने जाता पुढे रेणुका माता मंदिराकडून वळून मांजरी रोडला जावे
2) गायरान वस्तीकडून मुंढवा चौककडे येणाऱ्या वाहनचालकांनी रेणूकामाता मंदिर येथून डावीकडे वळून पुढे व्यंकटेश ग्राफीक्स येथून मुंढवा चौककडे जावे. वरील बदलानुसार नागरिकांनी वाहन चालवावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य कारावे असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.