यंदाचे वर्ष पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठरण्याची शक्यता
![This year is likely to be the hottest on earth](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/pv-summer-780x470.jpg)
पुणे : जागतिक पातळीवर यंदाचा सप्टेंबर हा १४३ वर्षांतील सर्वात उष्ण होता. सप्टेंबरमधील तापमान जागतिक सरासरीच्या ०.८८ डिग्रीने अधिक होते. तसेच यंदाचे वर्ष पृथ्वीवर नोंदवलेल्या गेलेल्या दहा सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अमेरिकास्थित नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फेरिक अॅमिनिस्ट्रेशनच्या (एनओएए) अहवालातून ही माहिती समोर आली.
आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया, अॅटलांटिक आणि उत्तर दक्षिण अमेरिका या प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. तर युरोप, उत्तर आशिया, भारताचा काही भाग, दक्षिण पूर्व पॅसिफिक महासागर या भागात सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया, मध्य युरोप, कॅरेबियन बेटे आणि दक्षिण-पूर्व आशियात झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे तापमान सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात समुद्रातील बर्फ मोठय़ा प्रमाणात कमी झाले. आर्टिक्ट सागरामध्ये १.८८ दशलक्ष चौरस मैल बर्फ आहे.
हे प्रमाण १९८१ ते २०१० या कालावधीतील बर्फापेक्षा कमी आहे. तर अंटाक्र्टिकामध्ये सरासरीपेक्षा १.९० दशलक्ष चौरस मैल कमी बर्फ असल्याचे अहवालात मांडण्यात आले आहे. अहवालानुसार २०२२ हे वर्ष आजपर्यंतच्या सर्वाधिक दहा उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता ९९ टक्के आहे. तर पहिल्या पाच सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.