अपेक्षित मंत्रिपदे न मिळाल्याने जिल्हा नाराज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-12-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्याला चारच मंत्रिपदे मिळाल्याने जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे. साताऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळाली; परंतु महायुतीला १८ आमदार निवडून देणाऱ्या पुणे जिल्ह्याला केवळ चारच मंत्रिपदे दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ या चार जणांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. गेली अनेक दशके मंत्री असलेले दिलीप वळसे- पाटील यांचा पत्ता कट केला आहे, तर याआधी मंत्रिपद उपभोगलेल्या विजय शिवतारे यांनाही संधी देण्यात आली नाही.
याशिवाय नव्याने राहुल कुल, महेश लांडगे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, त्यांनाही संधी न दिल्यामुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे. क्षेत्रफळ आणि एकूणच विस्ताराने लहान असलेल्या साताऱ्यात चार मंत्रिपदे दिली. मात्र, पुणे जिल्ह्याला कमी दिल्याने ही नाराजी व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून विधानसभा मिळवली. पुण्यातील २१ पैकी १८ जागा काबीज केल्या आणि मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुपडा बऱ्याबैकी साफ केला. असे असतानाही जिल्ह्याला मंत्रिपद देताना हात आखडता घेण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा’; ओमर अब्दुल्ला यांचा सल्ला
वळसे- पाटलांबाबतही पहिल्यांदाच मंत्रिपद डावलण्याचा प्रकार घडला आहे. मागच्या महायुतीच्याच टर्ममध्ये त्यांना सहकारमंत्रिपद होते. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये असताना गृहमंत्री, ऊर्जामंत्री, सहकारमंत्री, शिक्षणमंत्री अशी पदे त्यांनी उपभोगली आहेत. मात्र, महायुतीत आल्यानंतर त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये डावलण्यात आले आहे.
मिसाळ यांची आमदारकीची चौथी टर्म असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा होतीच. ती खरी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकालाच नव्याने मंत्रिपद मिळाले आहे.
दरम्यान आता पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोण, याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे घेणार, की चंद्रकांत पाटील यांना मिळणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, लवकरच हा गुंताही सुटेल, असे महायुतीतील नेत्यांनी सांगितले.