उड्डाणपुलाआधीच फुटली कात्रज चौकातील कोंडी

पुणे : कात्रज चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या आधीच हा चौक कोंडीमुक्त होणार आहे. या चौकातील रुंदीकरणात अडथळा ठरत असलेला गुगळे प्लाॅट अखेर भूसंपादनाने महापालिकेच्या ताब्यात आला आहे.
या भूसंपादनासाठी मागील १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ही जागा सुमारे ३९६८ चौरस मीटर आहे. ही जागा ताब्यात आल्याने आता कोंढव्याकडे जाण्यासाठी आणि पुन्हा चौकात येण्यासाठी वाहनांना सरळ वाट मिळणार आहे. याशिवाय उड्डाणपुलाच्या कामासाठीही जागा उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या भूसंपादन विभागाने ही जागा मंगळवारी सकाळी ताब्यात घेतली असून, त्यासाठी तब्बल २१ कोटींचा मोबदला दिला आहे. हा रस्ता ताब्यात घेण्यासाठी मागील वर्षी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्वत: वारंवार जागामालकांची भेट घेऊन प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर वर्षभराने ही प्रक्रिया अखेर पार पडली आहे. आज (मंगळवारी) सकाळी महापालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत ही जागा ताब्यात घेण्यात आली.
हेही वाचा – एक एप्रिल नव्हे; नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्येच
शहराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार म्हणून हा रस्ता ओळखला जातो. या चौकात पुणे, सातारा आणि नवले पुलाकडून येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, तसेच विस्तारीकरण झाले होते. मात्र, कोंढव्याकडे जाण्यासाठी सरळ मार्ग नव्हता. रस्त्याच्या मधोमध ही जागा होती. कोंढव्याकडे जाण्यासाठी अवघा ६ मीटरचा रस्ता होता. कोंढव्याकडून आल्यानंतर चौकात येण्यासाठी आठ मीटरचा चढाचा रस्ता होता.
परिणामी अवजड वाहनांना पुरेसी जागा नसल्याने सकाळपासूनच दिवसभर कोंडी होत होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपूल उभारला जात आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच ही जागा ताब्यात आल्याने चौकाचे विस्तारीकरण होणार असून, साताऱ्याकडून आलेली वाहने, तसेच स्वारगेटकडून आलेल्या वाहनांना चौकातून कोंढव्याकडे जाणे सहजशक्य होणार आहे.
तातडीने काम होणार – अनिरुद्ध पावसकर
ही जागा ताब्यात मिळताच पालिकेच्या पथ विभागाकडून तातडीने या चौकाचा आराखडा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार आठ दिवसांच्या आत तेथे रस्ता तयार करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. त्यामुळे कोंढव्याकडे जाणारा सध्याचा रस्ता बंद केल्यास या चौकातील उड्डाणपुलाच्या कामासही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.