थंडी अवतरली; ‘ऑक्टोबर चटका’ सलग तिसऱ्या वर्षी गायब
![The cold came; 'October Chatka' disappeared for the third year in a row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/winter-1-1-2-780x470.jpg)
पुणे : लांबणाऱ्या मोसमी पावसामुळे यंदा सलग तिसऱ्या वर्षी ‘ऑक्टोबर हीट’चा कालावधी वातावरणीय प्रणालीतून गायब झाला आहे. प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या तीव्र चटक्यांपासून सुटका झाली असली, तरी थंडीच्या कालावधीवर मात्र परिणाम झाला आहे. यंदाही थंडीच्या आगमनासाठी ऑक्टोबरच्या शेवटाची वाट पाहावी लागली. सध्या राज्यभर गारवा अवतरला आहे.
सध्या राज्याच्या सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊन थंडी सुरू झाली आहे. मुंबई परिसरासह विदर्भात तुरळक भागांत दिवसांच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका आहे. मात्र तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठा फरक पडलेला नाही. उर्वरित महाराष्ट्रात महिना अखेरीसही दिवसाचे तापमान सरासरीखालीच आहे.
र्नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास आणि एकूणच मोसमातील पावसाचा कालावधी गेल्या काही वर्षांपासून लांबत आहे. मोसमी पाऊस राजस्थानमधून परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात सुरू करीत असल्याचे आढळते. त्यानंतर मोसमी पाऊस संपूर्ण देशातून निघून जाण्यास अनेकदा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा घेत आहे. त्याचा परिणाम वातावरणाचे चक्र आणि थंडीच्या कालावधीवर होत आहे. २०१९ मध्ये १६ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि देशातून मोसमी पाऊस माघारी गेला होता. मात्र, त्यानंतर सलग तीन वर्षे त्याचे परत फिरणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ातच होत आहे. २०२० मध्ये २८ ऑक्टोबर, २०२१ मध्ये २५ ऑक्टोबर, तर २०२२ मध्ये २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस देशातून माघारी गेला. त्यामुळे ऑक्टोबरअखेपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहून थंडीची चाहूल लागण्यासही उशीर झाला.
यंदा राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांनी २० सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली, तरी उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणावर पाऊस होऊन परतीचा प्रवास लांबला. महाराष्ट्रातून १४ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, त्यापूर्वी आणि त्यानंतरही राज्याच्या विविध भागाला पावसाने झोडपून काढले. अरबी समद्रातून येणाऱ्या मोठय़ा प्रमाणावरील बाष्पामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबला. अखेर २३ ऑक्टोबरला त्याने महाराष्ट्रासह देशातून काढता पाय घेतला. लांबलेल्या या प्रवासामुळे ढगाळ वातावरण राहून दिवसाचे कमाल तापमान राज्यभर संपूर्ण महिन्यात सरासरीच्या खालीच राहिले. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’च्या कालावधीला यंदाही सुटी मिळाली आणि थंडी अवरतण्यासही उशीर झाला. ऑक्टोबरमध्ये मुंबई परिसर आणि कोकणात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात ३५ ते ३७ अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत ३५ ते ३८ अंशांपर्यंत कमाल तापमान गेलेले अनेकदा दिसून आले आहे. मात्र, तीन वर्षांपासून ही स्थिती बदलली आहे. यंदाही कमाल तापमानात फार मोठी वाढ होऊ शकली नाही. मोसमी वारे माघारी फिरल्यानंतर लगेचच तापमानात घट होऊन थंडीची चाहूल लागली आहे.
तापमाननोंद..
२८ ऑक्टोबरला तेथे १३.२, शनिवारी (२९ ऑक्टोबर) १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वरचे किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस होते. त्यापाठोपाठ पुणे येथे १३.३, नाशिक १३. ६, जळगाव १४.६, सातारा १५.२, परभणी १५.५, नागपूर आणि सोलापूर १६.६, सांगली १७.१, कोल्हापूर १७.५, अकोला १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
महाबळेश्वरपेक्षा औरंगाबाद थंड
निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे आठवडय़ाच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागांत थंडी अवतरली आहे. संपूर्ण राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली गेले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानातील घट अधिक आहे. गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. औरंगाबाद महाबळेश्वरपेक्षा थंड आहे.