पुण्याच्या तापमानात आणखी घट ; हंगामातील नीचांक कायम, रात्रीच्या गारव्यात वाढ
पुणे शहरामध्ये रात्रीच्या किमान तापमानात शनिवारी (२९ ऑक्टोबर) आणखी घट नोंदविण्यात आली. शहरात हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात घट होत असताना तापमानाचा हंगामातील नीचांकी कायम असल्याने रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अगदी गेल्याच आठवड्यात रेनकोट, छत्री जवळ ठेवणाऱ्या नागरिकांना आता स्वेटर, कानटोपी बाळगावी लागत आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आठवडाभर थंडीची स्थिती कायम राहणार आहे. मात्र, तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
मोसमी पाऊस माघारी फिरल्याच्या दिवसापासून शहरातील तापमानात एकदमच पाच ते सहा अंशांनी घट होऊन थंडी अवतरली. तापमानातील ही घट २३ ऑक्टोबरपासून कायम आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातही सर्व ठिकाणी सध्या निरभ्र आकाश असून, कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होण्यास पोषक वातावरण आहे. परिणामी दररोजच शहराच्या तापमानात काही प्रमाणात घट होत असताना दिसून येत असून, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांतील ऑक्टोबरमधील नीचांकी तापमानही नोंदविले जात आहे. दिवसाही निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा काही प्रमाणात चटका जाणवत असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे.
पुणे शहरात शनिवारी १३.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.५ अंशांनी कमी होते. त्यामुळे पहाटे चांगलाच गारवा जाणवत आहे. काही भागांत पहाटे आणि सकाळी हलके धुकेही दिसून येत आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, आणखी दोन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होऊ शकते. दिवसाचे कमाल तापमान शनिवारी ३०.३ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. त्यातही पुढील आठवडाभर चढ-उताराची शक्यता आहे.
पुणे शहरात २४ ऑक्टोबरला १४.४ अंश सेल्सिअस, तर २५ ऑक्टोबरला १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. २६ आणि २७ ऑक्टोबरला १४.३ अंश सेल्सिअसवर किमान तापमान होते. २८ ऑक्टोबरला तापमानात पुन्हा घट होऊन १३.८ अंश सेल्सिअस किमान नोंदविले गेले. २९ ऑक्टोबरला मात्र यंदाच्या हंगामातील नीचांकी १३.३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा खाली आला. ऑक्टोबरमधील गेल्या चार वर्षांतीलही हे तापमान नीचांकी ठरले. यापूर्वी २०१८ मध्ये ३० ऑक्टोबरला १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.





