धायरीसह नऱ्हेला मिळणार शुद्ध पाणी

पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या धायरीचा उर्वरीत भाग आणि नऱ्हे या दोन गावांना महापालिकेकडून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला असून या कामासाठी सुमारे ७० लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
या कामासाठीची निविदा प्रक्रीयाही प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी दिली. महापालिकेकडून सध्या धायरीच्या जुन्या हद्दीत वडगाव जलकेंद्रातून पाणी देण्यात येत आहे. तर उर्वरीत धायरी आणि नऱ्हे या दोन्ही गावांना ग्रामपंचायतीच्या जुन्या यंत्रणे द्वारेच पाणी देण्यात येत आहे.
शासनाकडून महापालिकेची हद्दवाढ करत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला आले. त्यात, खडकवासला धरणापासूनच्या गावांचा समावेश असून धायरीचा उर्वरीत भाग आणि नऱ्हेचाही समावेश आहे. यातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी, नऱ्हे गावात काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे जीबीएसची साथ पसरली होती. या गावांना महापालिकेकडून अद्यापही शुध्द पाणी दिले जात नाही. धरणातील पाणी थेट ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या यंत्रणे प्रमाणे विहिरीत सोडून देण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘बनावट पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
त्यामुळे, या भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळत नाही. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने या गावांना पाण्यासाठी सुमारे ८०१ कोटींची पाणी योजना प्रस्तावित केली असून त्याचा प्रस्तावही शासनास पाठविला जाणार आहे. मात्र, तूर्तास महापालिकेस उर्वरीत धायरीचा भाग आणि नऱ्हे गावाला वडगाव जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी जोडून तातडीनं पाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या कामासाठी अवघा ७० लाखांचा खर्च येणार असून दोन महिन्यात हे काम पूर्ण करता येणार आहे.
ज्या गावांमधे जीबीएसचे रूग्ण आढळून आले होते. त्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींवर महापालिकेकडून विहिरींवर स्वयंचलित क्लोरीनेशन यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच विहिरींना सुरक्षीत जाळीचे कवचही बसविण्यात आले आहे . या कामासाठी आता पर्यंत सुमारे ८५ लाखांचा खर्च करण्यात आला आहेत. त्या माध्यमातून सध्या धायरी, खडकवासला, नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी या परिसराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नांदेड विहीर, बारांगणे मळा विहीर, खडकवासला जॅकवेल, प्रयेजा सिटी या चार ठिकाणी हे क्लोरिनेशन मशिन बसविण्यात आले आहे.