तळेगावात रंगली शास्त्रीय संगीताची ‘रागरंग’ मैफल!
युवा गायिका सावनी पारेकर-सरगम चन्ना-भारद्वाज यांच्या बहारदार गायनाने रसिकांची मने जिंकली
![Yellow, teeth, personality, beliefs, results,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/raga-780x470.jpg)
तळेगाव दाभाडे : मावळ परिसरातील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महत्त्वाची ओळख असलेल्या श्रीरंग कलानिकेतन आणि विकेंड युफनीच्या संयुक्त विद्यमाने ‘रागरंग’ ही शास्त्रीय संगीताची मैफल उत्साहात संपन्न झाली. रविवारी (२ फेब्रुवारी २०२५) कांतिलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात युवा गायिका सावनी पारेकर आणि सरगम चन्ना-भारद्वाज यांनी आपल्या बहारदार गायनाने रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सौ. संपदा थिटे, श्रीरंग कलानिकेतनचे विश्वास देशपांडे, ज्येष्ठ तबलावादक विनय कशेळकर, डॉ. राजेंद्र कुलकर्णी आणि विकेंड युफनीचे नितेश कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पहिल्या सत्रात सावनी पारेकर यांनी पुरिया आणि नायकी कानडा रागांमधील पारंपरिक बंदिशींना आपल्या सुमधूर आवाजाने जिवंत केले. त्यांच्या गायकीतली नजाकत आणि तालीम रसिकांच्या मनाला भिडली. दुसऱ्या सत्रात सरगम चन्ना-भारद्वाज यांनी मधुवंती आणि भैरवी राग सादर करत कार्यक्रमाची रंगत शिगेला नेली.
हेही वाचा : महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद
या मैफिलीला तबलावादक चेतन ताम्हणकर आणि संवादिनीवर प्रिया करंदीकर-घारपुरे यांनी अप्रतिम साथसंगत केली. अशा कार्यक्रमांमुळे शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला चालना मिळते, असे संयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक पं. विनोद भूषण आल्पे, संगीत संयोजक विश्वास पाटणकर, आणि तबलावादक सुनील देशपांडे यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन सौ. रश्मी कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक नितेश कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन ‘रसिक साऊंड’चे केदार अभ्यंकर यांनी केले, तर छायाचित्रण श्रीकांत चेपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक आपटे आणि श्रावणी कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली.
‘रागरंग’ मैफिलने शास्त्रीय संगीत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला!