सुधागड, अंधारबन अनिश्चित काळासाठी बंद

पुणे : सुधागड अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या अंधारबन जंगलट्रेक आणि कुंडलिका व्हॅली येथे अनिश्चित काळासाठी पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने यासंदर्भात फतवा काढला असून, सुटीच्या दिवशी होणारी हजारोंची गर्दी, नियंत्रणाबाहेर जाणारे पर्यटक आणि नैसर्गिक, वन्यजीव अधिवासाला होणारा त्रास हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही. याची अंमलबजावणी शुक्रवारपासूनच (४ जुलै) सुरू झाली आहे.
यासंदर्भातील परिपत्रक वन विभागाचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) राहुल गवई यांनी गुरुवारी जारी केले आहे. कुंडलिका येथील अपघाताची घटना ताजीच आहे. असे असतानाही त्या भागात अद्यापही पर्यटकांची हजारोंच्या संख्येने गर्दी असते. सुटीच्या दिवशी तर ती अनियंत्रितच होते. गेल्या शनिवार- रविवारी याठिकाणी सकाळी एकाच वेळी तीन हजार पर्यटकांनी प्रवेश मागितला. याशिवाय काही हजारजण प्रवेश तिकिटाच्या रांगेत होते. यामुळे वन विभागाला तिकीट खिडकी बंद करावी लागली.
हेही वाचा – महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी सत्कार
एवढ्या मोठ्या संख्येने या जंगलात जाणारे पर्यटक, त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवणार, हा प्रश्न वन विभागासमोर आहे. याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पर्यटक वन्यजीव संरक्षित भागात फिरल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे तर नुकसान होणारच; शिवाय वन्यजीवांनाही त्यांच्या अस्तित्त्वाचा त्रास होणार आहे. त्यामुळे वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
वन विभागाने किंवा पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन पर्यटकांकडून होत नाही. अनियंत्रित गर्दी झाल्यावर मनुष्यबळाअभावी या दोन्ही यंत्रणा एका ठराविक मर्यादेनंतर हतबल होतात. अशातच पर्यटकही त्यांच्याशी हुज्जत घालतात.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
‘वन्यजीव विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने अनियंत्रित पर्यटन रोखण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही अभयारण्यात पर्यटकांना अनिश्चित काळासाठी प्रवेशबंदी केली आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेने उल्लंघन केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
– राहुल गवई, उपवनसंरक्षक, वन विभाग (वन्यजीव)