इंडिका इंडस्ट्रीज कंपनीला आग, संपूर्ण गावात आग आणि धूर
घातक कचरा पेटविल्याने कंपनीला आग लागल्याचे निदर्शनास

पुणे : सणसवाडी (ता. शिरूर) येथे इंडिका इंडस्ट्रीज कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने गुरुवारी (ता. ३) रात्री अचानक भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण गावात आग आणि धूर दिसत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिकांनी पोलिस ठाणे, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला हा प्रकार कळविल्यावर सर्वस्तरांवर प्रयत्न झाले आणि आग पुढील दोन तासात आटोक्यात आणण्यात आली. घातक कचरा पेटविल्याने कंपनीला आग लागल्याचे निदर्शनास आले. कंपनीकडून सतत घातक कचरा पेटविला जात असल्याने स्थानिकांनी कंपनी आणि प्रदूषण महामंडळाच्या विरोधात तक्रारी आणि संताप व्यक्त केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास येथील कंपनीतून मोठे आगीचे लोळ व धूर निघत असल्याचे गावात दिसू लागले. त्यामुळे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर दरेकर यांनी पोलिसांना कळविले. पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लहानू बांगर, शंकर साळुंके, पोलिस नाईक प्रफुल्ल सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा – टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”
आगीची स्थिती पाहून पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशमन पथकाला बोलावून आग आटोक्यात आणली. सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आली नाही, अन्यथा आजूबाजूच्या १० ते १५ कंपन्यांनाही आग लागण्याचा धोका होता. दरम्यान, या घटनेबद्दल प्रदूषण महामंडळाचे निरीक्षक एस. बी. कुकडे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
प्रदूषण महामंडळाचे काही लोक कंपनीत आलेले असून, गुरुवारच्या दुर्घटनेत ठिणगी नेमकी कशी, कुठे पडली आणि ही आग लागली याचा शोध आम्ही घेत आहोत. या शिवाय या आगीत कंपनीचे किती नुकसान झाले आहे त्याचाही शोध आम्ही घेत आहोत.
– संजय खंडारी, प्रतिनिधी, इंडिका इंडस्ट्रीज
इंडिका कंपनीचा कचरा जाळता जाळता त्याचे भीषण आगीत रूपांतर झाले. केमिकल कंपनी असल्याने या धुराचे मोठे दुष्परिणाम गावावर होत आहेत. यापुढे कंपनीने आपला कचरा जाळताना ग्रामपंचायतीला कळवून जाळावा. या शिवाय प्रदूषण महामंडळासमवेत ग्रामपंचायत आणि स्थानिकांची बैठक करूनच कचरा जाळावा अन्यथा आंदोलनाची भूमिका घेऊ.
– सागर दरेकर, शाखाध्यक्ष, क्रांतिवीर प्रतिष्ठान