दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Mahayuti-12-780x470.jpg)
पुणे : मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरविला जात आहे. तसे आढळल्यास आणि अन्य अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिला आहे.
मतदान यादीत नाव नसल्यास फॉर्म क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याच्या संदेश मोबाईलद्वारे पसरविण्यात येत आहे. फॉर्म क्र. १७ हा दहावी, बारावीच्या परीक्षेस बाह्यरित्या प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या ‘शाश्वत विकास’साठी एक मत मोलाचे!
त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नागरिक व प्रशासन अशा दोघांना विनाकारण त्रासाला सामारे जावे लागत आहे. असे संदेश जिल्ह्यात पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीत नाव नसेल तर संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.