संग्राम थोपटेंचा भाजपात प्रवेश, म्हणाले; “काँग्रेस सोडण्याची वेळ त्या पक्षानेच आणली..”

Sangram Thopte : काँग्रेसला हात दाखवून माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर ते भाजपात जाणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात असलेल्या इतर कार्यकर्त्यांनीही संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला आहे. यानंतर संग्राम थोपटे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. संग्राम थोपटेंच्या प्रवेशानंतर जय श्रीराम आणि एकच वादा संग्राम दादा अशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या.
“आज भाजपातील पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत माझआ आणि आपला सगळ्यांचा प्रवेश झाला असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. मागच्या चार दिवसांपासून संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सगळ्या चर्चांवर पडदा पडला. मला अनेकांनी विचारलं काँग्रेस का सोडत आहात? वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली आणि वाढवली मग तो पक्ष का सोडता? ही वेळ माझ्यावर काँग्रेसनेच आणली. माझ्यावर अन्याय होत होता हे पाच ते सात वर्षांपासून सगळेच पाहात होते. मला अनेकांनी निर्णय घे असं सांगितलं होतं पण मी सहजासहजी निर्णयापर्यंत पोहचत नव्हतो. मी पक्षाशी निष्ठा ठेवली. मात्र निष्ठेचं काहीही फळ मला मिळालं नाही.” असं संग्राम थोपटेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – विलेपार्ले मंदिर प्रकरण: पुण्यात जैन समाजाचे आंदोलन
पक्षाची ताकद मिळो किंवा न मिळो, पक्षाची ताकद तळागाळापर्यंत काँग्रेस पोहचवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज मात्र पक्षानेच आमच्यावर ही वेळ आणली आहे. मी अनेक कार्यकर्त्यांना शांत केलं होतं. पण आम्ही अखेर आज निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांचं काम मी पाहिलं आहे. एकदा शब्द दिला की ते मागे फिरवत नाहीत. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची निश्चित वेळ यावी लागते. ही वेळ आली आहे. आम्ही स्वाभिमानाने काम करणारी माणसं होतो, आहोत आणि राहू. असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे.
संग्राम थोपटे येण्याची चर्चा होती त्याप्रमाणे आज तो प्रवेश झाला आहे. गेले काही दिवस चर्चा सुरु होती की संग्राम येतो की नाही? मात्र संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये भूकंप आल्यासारखी स्थिती आहे. विदर्भातले नेते रोज विचारत होते की संग्राम येतो आहे का? मी त्यांना सांगितलं की संग्रामने संग्राम जिंकला आहे तो भाजपात येतो आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.