साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलला फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार प्रदान
![Sadhu Vaswani International School awarded La Fide Chess School Gold Award](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sadhu-Vaswani-International-School-780x470.jpg)
पुणे | मोशी येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलला जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) एज्युकेशन कमिशनकडून ‘बुद्धिबळ शाळा’ या प्रकारातील सुवर्णपदक जाहीर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवसाच्या निमित्तानी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने योग प्रात्यक्षिक तथा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुरस्काराचे वितरण जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या एज्युकेशन कमिशनचे सदस्य बोरीस ब्र्हुन, भारताचे ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, फिडेच्या सोशल कमिशनचे अध्यक्ष आंद्रे व्हॉग्टलीन, सचिव लासमा कोकोरेव्हिका आणि फिडे मिडीयाच्या भारतीय प्रतिनिधी नंधिनी सारीपल्ली आदी मंडळीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, शाळेतील बुद्धिबळ प्रशिक्षक केशव अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा – खिशात ७० रुपये, मग १०० रुपये खर्च करणार कसे? अर्थसंकल्पावपरून शरद पवारांचा टोला
या पुरस्कारासाठी जगातील २२ शाळांनी अर्ज केला होता. यापैकी १३ शाळांना सुवर्ण, सहा शाळांना रौप्य तर ३ शाळांना कांस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या शाळांमध्ये भारतातील केवळ दोन शाळा आहेत. पुरस्कार मिळालेली दुसरी शाळा ही चेन्नई येथील असल्याचे शाळेच्या समन्वयिका रोशन जॉर्ज यांनी पुरस्काराची माहिती देताना सांगितले.
पुरस्काराच्या वेळी फिडेच्या अधिकाऱ्यांनी शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेताना, शाळा बुद्धिबळ या खेळासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांनी शाळेच्या बुद्धिबळ कक्षाला भेट दिली. या कार्यक्रमाचे आयोजन संगीत व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
योग-संगीत कार्यक्रमाने मान्यवर मंत्रमुग्ध
मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. जर्मन भाषिक प्रतिनिधी मंडळ असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत जर्मन भाषेत केले. संगीत विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेले शास्त्रीय संगीत आणि जर्मन भाषेतील गीतांना मान्यवरांनी भरभरून दाद दिली. शाळेतील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योग प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.