महापालिकेस विक्रमी उत्पन्न; ८ हजार २७२ कोटींचा आकडा पार

पुणे : महापालिकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी ८ हजार २७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेक भांडवली कामे रखडली असली तरी महसूल संकलनात वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये महापालिकेस ८ हजार २६२ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
महापालिकेच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा बांधकाम परवानग्यांचा असून त्यातून तब्बल २ हजार ६०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याखालोखाल मिळकत कर (२ हजार ३६५ कोटी रुपये) आणि जीएसटी वाटा (२ हजार ५०० कोटी रुपये) हे प्रमुख उत्पन्न स्रोत ठरले आहेत. तसेच, पाणीपट्टीतून ११६ कोटी रुपये, मुद्रांक शुल्कातून १९० कोटी रुपये आणि इतर जमा व शासकीय अनुदानातून ५०० कोटी रुपये मिळाले आहेत.
हेही वाचा – ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा रद्द: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; मूळ संकल्पना बदलणार नाही पण…
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे महत्त्वाची भांडवली कामे रखडली होती. मात्र, आता निवडणुकाही संपल्याने पुढील वर्षभरात शहरातील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच, ३१ मार्च पर्यंत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात खर्चाची बीले सादर झालेली असून त्यांची नोंदणी तसेच इतर कामांसाठी आणखी तीन ते चार दिवस जाणार असल्याने मागील आर्थिक वर्षात नेमका खर्च किती झाला हे समजणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ११ हजार ६०१ कोटींचे अंदाजपत्रक मान्य करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनास ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न मिळाल्याने महापालिकेची अंदाजपत्रकीय तूट तब्बल ३ हजार ३२९ कोटी रुपयांवर गेली आहे. तर, पालिका प्रशासनाकडून २०२५-१६ या आर्थिक वर्षासाठी आता तब्बल १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामुळे एका बाजूला महापालिकेचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे मात्र, अंदाजपत्रकाचा आकडा फुगतच असल्याने अंदाजपत्रकीय तूट मोठ्या प्रमाणात वाढत आहे.