पुण्याचा पाणीप्रश्न पेटणार? खडकवासला धरणांतील पाणी तळाला, तरीही कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-21-780x470.jpg)
पुणे : खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे ग्रामीण भागासाठी बुधवारपासून (२२ मे) पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दौंडला पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. हे पाणी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या अडीच टीमएसी पाण्यापैकी आहे का, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत सध्या ६.१४ टीएमसी म्हणजे २१.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी कमी झाल्याने पुणेकरांवर कपातीची टांगती तलवार आहे. अशा वेळी दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यानुसार कपातीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागाला दिलेले पहिले उन्हाळी आवर्तन नुकतेच पूर्ण झाले. दुसरे आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही, पण दौंड शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी झाल्यामुळे सध्या एक टीमएसी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – पुढील दोन, तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. याबरोबरच दौंड, इंदापूरसह पुरंदर आणि बारामतीच्या काही भागांनादेखील पाणी दिले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ४ मार्चपासून पहिल्या आवर्तनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. हे पाणी ९ मेपर्यंत सोडण्यात आले. या कालावधीत ५.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आता पुन्हा २२ मेपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे रोजी ५०० क्युसेक, तर २३ मे रोजी ७०३ क्युसेकने पाणी नवीन मुठा उजवा कालव्यात सोडण्यात आले. दौंड शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत ६.१४ टीएमसी (२१.०६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. त्यांपैकी टेमघर धरणात ०.१६ टीएमसी (४.४५ टक्के), वरसगाव ३.१६ टीएमसी (२४.६४ टक्के), पानशेत १.९१ टीएमसी (१७.९७ टक्के) आणि खडकवासला ०.९० टीएमसी (४५.७२ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.