पुण्याच्या विकासाला सुपरफास्ट चालना देऊ, नवनिर्वाचित आमदारांची पुणेकरांना ग्वाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-87-780x470.jpg)
पुणे : पुण्याच्या विकासाला सुपरफास्ट चालना देऊ, अशी ग्वाही शहरातील नवनिर्वाचित आमदारांनी मंगळवारी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, हडपसरचे आमदार चेतन तुपे , वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव याप्रसंगी उपस्थित होते.
२०१४-१९ या काळात राज्य आणि पुण्याच्या विकासाला गती दिली. समान पाणीपुरवठा योजना, जायका प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुण्याच्या पाण्याची समस्या सुटेल. पीएमपीकडे ३५०० बस असाव्यात, यासाठी प्रयत्न करू. मार्च एप्रिलपर्यंत महापालिकेची निवडणूक झाल्यास शहरातील स्थानिक समस्यांवर अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
समाविष्ट गावांंत सुविधा पुरवण्याला प्राधान्य असेल. कात्रज परिसरात मोठा बंधारा बांधून पुण्याला अतिरिक्त पाणी देता येईल, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या.
हेही वाचा – सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
भूसंपादनासाठी रोख मोबदल्याच्या मागणीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते, सेवा रस्ते, प्रकल्प रखडले आहेत. त्यावर ‘क्रेडिट नोट’ हा पर्याय उपयुक्त ठरेल. समाविष्ट गावांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून, त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेन, अशी मागणी असल्याचे भीमराव तापकीर म्हणाले.
रिंगरोडसाठी पाठपुरावा करेन. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो वर्षभरात कार्यान्वित होईल. सार्वजनिक स्वच्छतागृहांचे लेखापरीक्षण करून आवश्यक त्या सुधारणा करू, असे सिद्धार्थ शिरोळे यांनी नमूद केले.
वाहतूक, पाणी, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण आणि स्वच्छता या विषयांवर शहराचा २५ वर्षांचा रोडमॅप निश्चित करावा. समाविष्ट गावांसह सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करावा. अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालावा, अशी सरकारकडे मागणी असल्याचे चेतन तुपे म्हणाले.
दोन्ही रिंगरोड मार्गी लागल्यानंतर त्याबाहेर शहर विस्तारणार नाही, असे निश्चित करावे लागेल. ‘डीपी’, ‘आरपी’मधील रस्ते मार्गी लागले पाहिजेत. नदीकाठाने वारजे ते थेऊरपर्यंत रस्ता करावा. रिंगरोडवर मेट्रोही असावी, असे पठारे म्हणाले. अश्विनी जाधव केदारी यांनी सूत्रसंचालन केले.
‘समाविष्ट गावांमुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे महापालिकेवर ताण येत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी तुपे यांनी केली. समाविष्ट गावांमुळे पुण्याची हद्द मोठी झाली आहे. त्यामुळे आता आणखी उशीर न करता स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.