माजी मंत्री ‘संजय राठोड’ यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?
![Pune police's clean chit to former minister 'Sanjay Rathore'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Sanjay-Rathod-Pooja-Chavan-1-e1614072423558.jpg)
पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. अखेर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला होता. त्यावर आता पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर येत आहे.
पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला आहे. त्यानंतरच संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचं समजतंय. त्यांच्या या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे.
राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यातच आता क्लिन चिट मिळण्याची माहिती समोर आल्यानं त्यांच्या मंत्रीपदाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, प्रकरणातील संबंधित तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर काही दिवस संजय राठोड अज्ञातवासात होते. विरोधकांच्या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.