PMRDA | पुणे प्रदेश महानगर प्राधिकरणाची अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई!
पीएमआरडीएची कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी भरली ४८ लाखाची रक्कम

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२१) कारवाई करण्यात येत आहे. यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे.
हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डींगधारक व ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डींगधारकांनी अंतिम चलणाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कारवाईवेळी तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दिप्ती घूसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.
हेही वाचा : UPSC | पुण्याच्या मोक्ष राणावतने इतिहास रचला!
प्राधिकरण क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे होर्डीगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची दखल घेऊन यापुढे नियमित अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यात येणार आहे. वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन आकाशचिन्ह उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या सहआयुक्त (प्र) डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.