‘आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती’; जयंत पाटील
पुणे : महायुतीचे सरकार आता स्थापन होईल, पण २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन व्हायला हवे होते. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी होती. याबाबत राज्याचे राज्यपाल यांनी निर्णय घ्यायला हवा होता. पण महायुतीला वेगळे नियम लावले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात लोकशाही बचाब आत्मक्लेष आंदोलन केले. यावेळी जयंत पाटील यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे; गृह खात्यासाठी रस्सीखेच!
ते पुढे म्हणाले की, महाय़ुतीची सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला आता जास्त स्थान राहणार नाही. लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेसाठी बोलावले आहे. काँग्रेस आता बाजू मांडेल. बाबा आढावांनी उपोषण सोडावं. अशीच आंदोलन महाराष्ट्रभर होतील, असे उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर पाटील यांनी आंदोलनाला समर्थन असल्याचे सांगितले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढावा यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, EVM बद्दल आता कोणीही तक्रार करत बसू नये. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. असे पवार यांनी बाबा आढावा यांच्या बाजूला बसूनच सांगितले.