पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-63-780x470.jpg)
पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली.
पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – ..तर पुढचा मुख्यमंत्री मीच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान
तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत. आता हे खटले जलद गतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.