पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे पोलिसांनी उघड केलंय.
छापेमारीदरम्यान घटनास्थळी तीन महिला आणि पाच पुरुष उपस्थित होते. प्रांजल केवळकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जण मिळाले. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या पतीचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती या रेव्ह पार्टीत सहभागी असल्याचा संशय आहे.
यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजून मला पुर्णपणे काही माहिती नाही. जे वातावरण चालु आहे, त्यादरम्यान अडकवण्याचा प्रयत्न होवू शकतो. माझ्या वक्तव्यांमुळे जावयाला अडकवलं जातंय. जावई असला तरी गुन्हा असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. मी माहिती घेईल. गुन्हेगार असेल तर नीट चौकशी झालीच पाहिजे, पण षडयंत्र असेल तर ते समोर यायला पाहिजे.
हेही वाचा – लोकशाही नेतृत्वात मोदी आघाडीवर; जागतिक सर्वेक्षणाचा निष्कर्ष
पोलिसांनी घटनास्थळी अमली पदार्थ, विविध प्रकारची दारू आणि हुक्का उपकरणं जप्त केली आहेत. याशिवाय ड्रग्जच्या सेवनाचे पुरावेही ताब्यात घेतले आहेत. ते न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या पार्टीतील काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्सचा वापर झाल्याची पुष्टी झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा या ठिकाणी छापा टाकला. खराडी भागातील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटमध्ये पार्टी सुरू असल्याची माहिती आधीपासूनच पोलिसांकडे होती. कारवाई दरम्यान कुठलाही विरोध न करता सर्व उपस्थितांना ताब्यात घेण्यात आलं.
या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. संबंधित नेत्या रोहिणी खडसे यांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. “नैतिकतेचे डोस देणारेच अशा गोष्टीत सापडले, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका विरोधकांनी केली.




