ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यकच

पुणे : जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा – त्रिवेणीनगरमार्गे नाशिक व जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पुर्णत्वावर
ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यासंबधी पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करुन पोलिसांच्या परवानगी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.