भारताच्या महिला संघासाठी गुड न्यूज! ऑलिम्पिक २०२८ साठी मिळाली थेट एन्ट्री

Los Angeles Olympics 2028 | महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या साखळी टप्प्यातून भारतीय संघाला बाहेर पडावे लागले असले, तरी आता टीम इंडियासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांनी सोमवारी या ऐतिहासिक पुनरागमनाची पात्रता प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर केली.
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पहिले चार संघ निश्चित करण्यात आले आहेत. आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या चार प्रमुख खंडांमधून सर्वोच्च स्थान मिळवणाऱ्या प्रत्येकी एका संघाला ही थेट लॉटरी लागली आहे.
या प्रक्रियेनुसार आशिया खंडातून भारत, ओशिनियातून ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधून ग्रेट ब्रिटन (इंग्लंडमार्फत) या संघांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक खंडातून केवळ एकाच संघाला ही थेट पात्रता देण्यात आली आहे, ज्यामुळे आशियातून भारताचे स्थान पक्के झाले आहे.
ऑलिम्पिक २०२८: क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप कसे असेल?
तब्बल अनेक दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून, ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी ६ संघ सहभागी होतील. आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशिनिया या चारही खंडांतील किमान एका संघाला स्थान बंधनकारक असल्याने यात जागतिक प्रतिनिधित्व पाहायला मिळेल.
हेही वाचा
मालमत्ता कर भरताना १० टक्के सवलत घेण्याची ३० जून २०२६ रोजी शेवटची संधी
The road to LA28 is set 🤩
The qualification pathway for cricket’s historic return to the Olympic Games has been announced 🏅https://t.co/hUFaPyAA0g
— ICC (@ICC) June 29, 2026
पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी पाच संघांची निवड विद्यमान आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी आणि आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या आधारे केली जाणार आहे. तर दोन्ही गटातील सहावा व अखेरचा संघ २०२७ मध्ये प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या आयसीसी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित केला जाईल.
यजमान अमेरिकेसाठी अव्वल-१५ ची कडक अट
यजमान देश म्हणून अमेरिकेला पुरुष आणि महिला दोन्ही गटात थेट पात्रतेची संधी आहे. मात्र, त्यासाठी ३० जून २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या पात्रता कालावधीत अमेरिकेचा संघ आयसीसी टी-२० क्रमवारीत किमान अव्वल-१५ मध्ये असणे आवश्यक आहे. जर अमेरिकेचा महिला संघ ही अट पूर्ण करू शकला नाही, तर १ मार्च २०२७ च्या क्रमवारीनुसार अद्याप पात्र न ठरलेल्या कोणत्याही खंडातील सर्वोच्च क्रमांकाच्या संघाला ते पाचवे स्थान दिले जाईल.
दुसरीकडे, पुरुष गटातील पात्रता स्थानांचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबर २०२६ रोजीच्या आयसीसी टी-२० क्रमवारीनुसार घेतला जाईल. जर अमेरिकेचा पुरुष संघही ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अव्वल-१५ मध्ये राहिला नाही, तर अद्याप पात्र न ठरलेल्या देशांमधील सर्वाधिक मानांकित संघाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळेल. महिला टी-२० विश्वचषकातील पराभवाच्या दुःखात असलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि महिला संघासाठी ही ऑलिम्पिक एन्ट्री नक्कीच एक मोठा दिलासा ठरणार आहे.





