जनतेला त्यांची रोजीरोटी बळकट कशी होईल याची चिंता – प्रवीण दरेकर
![Praveen Darekar's dominance over Mumbai District Bank ends; Siddharth Kamble wins, Prasad Lad loses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Pravin-Darekar-1.jpg)
- स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीला टोला
लोणावळा :- राज्यात सध्या शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनता हि हतबल झाली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नसून, सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली आहे. स्वबळाचा नारा आणि त्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आज एक बोलायचे उद्या दुसरे बोलत एकमेकांवर टीका करत नांदत आहे. त्यांना त्याची लाज शरम वाटत नाही. तुमच्या कर्मामुळे जनता, शेतकरी व कामगार यांच्या हातात बळ व ताकद उरली नसल्याने त्यांना तुमच्या स्वबळाचे काहीही पडलेले नाही. महाविकास आघाडीला केवळ आपले सरकार कसे टिकेल याच्यातच स्वारस्य आहे. जनतेच्या हातात आता बळ आणि ताकद जरी उरली नसली तरी, हीच जनता तुम्हाला सत्तेतून पायउतार करायला मागेपुढे पहाणार असा टोला. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला टोलावला आहे.
लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या कामगार प्रतिनिधी बैठक प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता. यात काय वावगे नाही, प्रत्येक पक्षाला त्यांची काही मते असतात त्यांना स्वबळाचा नारा देणे व पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. परंतु स्वबळाचा नारा देताना राज्याच्या जनतेच्या हातामध्ये आता बळ व ताकद उरली नसल्याने जनतेला याचे काहीही देणेघेणे नाही. आज सवर्सामान्य जनता, शेतकरी, कामगार पूणर्पणे उद्ध्वस्त झाला आहे. करोनाच्या संकटात कामगाराला पगार व कामावर जायला यायला दळणवळणाची व्यवस्था नाही. तो कर्जबाजारी झाला असून, बँकाचे कर्ज भरायला त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांचे पूर्णपणे अवसान गेले आहे. राज्यातील कामगार व शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही, पिक विमा त्यांना मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बेरोजगार तरुण कामाच्या प्रतिक्षेत आहे. तुमच्या स्वबळापेक्षा त्यांना त्यांचे कुटुंब, संसार आणि व्यवस्था कशी बळकट होणार याची चिंता लागली आहे. त्यांच्या हाताला बळ द्या, नाही तर तुमच्या कर्मामुळे बळहीन झालेली हि जनता कधी तुम्हाला पळ काढायला लावेल. याचा नेम नाही. असा टोला दरेकर यांनी लगावला.
देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदीजींनी तीन कायदे केले परंतु त्या ठिकाणी दलांचे नेतृत्व करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित पाहवत नाही. शेतकऱ्यांना थेट पैसे व ग्राहकांना थेट माल मिळणार आहे. शेतकऱ्यांना जास्त पैसे आणि हमी मिळत असल्याचे श्रेय मोदीजींना जाऊ नये म्हणून केवळ त्यांना टार्गेट करायचे या भावनेतून हा शेतकरी कायदा कसा शेतकरी विरोधात आहे. हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.