पुणे मेट्रोच्या तीन स्थानकांची नवी प्रवेशद्वारे आजपासून खुली

पुणे | मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा या उद्देशाने पुणे मेट्रो प्रशासनाने तीन महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून पिंपरी-चिंचवड मनपा, स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना वर्दळीचे रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही. परिणामी, वेळ आणि श्रमांची बचत होऊन सुरक्षेतही वाढ होणार आहे.
नवीन प्रवेशद्वारांचा तपशील आणि ठळक वैशिष्ट्ये:
१. पिंपरी चिंचवड मनपा मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र ३):
हे प्रवेशद्वार पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. या प्रवेशद्वारामुळे पिंपरी शहरातून येणाऱ्या व स्थानकातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडावा लागणार नाही. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.
हेही वाचा : ‘पीसीसीओईआर’ला विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
२. स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ५):
हे नवीन भुयारी प्रवेशद्वार एमएसआरटीसी (एसटी) बसस्थानकाच्या बाजूला सुरू होत आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकात प्रवेश मिळणार आहे. स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, जेधे चौक ओलांडण्यासाठी मुख्य रस्त्यावर येण्याची गरज उरणार नाही.
३. शिवाजीनगर मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ३):
आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौकात हे भुयारी प्रवेशद्वार उघडण्यात येत आहे. गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे सुलभ होणार आहे. मुख्य रस्त्याशी थेट जोडणी मिळाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या पाहता त्यांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत करणारा प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्थानकांची आणि मार्गांची जोडणी करण्यात आली आहे.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे.




