मोटारसायकल शर्यतीत सार्थक ठरला कमी वयात राष्ट्रीय विजेता
सार्थक चव्हाणची मोटारसायकल शर्यतीच्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी
![Motorcycle, race, meaningful, national, winner,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/sarthaka-780x470.jpg)
पुणे : अवघ्या १७ वर्षांच्या सार्थक चव्हाणने मोटारसायकल शर्यतीच्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी केली आहे. ‘इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप-२०२४’ मधील ‘प्रो स्टॉक ३०१-४०० सीसी’ या खुल्या श्रेणीतील सर्वांत तरुण राष्ट्रीय विजेता बनण्याचा विक्रम सार्थकने नुकताच केला आहे.
या कामगिरीसह सार्थकने १५० ते ४०० सीसी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकल श्रेणीमध्ये तब्बल १७ शर्यती जिंकल्या आहेत. सार्थकच्या या यशामुळे देशातील सर्वांत तेजस्वी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली आहे.
मूळचा सदाशिव पेठेत राहणाऱ्या सार्थकच्या कुटुंबात दुचाकी शर्यतीचे वातावरण त्याच्या जन्माच्या आधीपासून होते. त्याचे वडील श्रीकांत चव्हाण यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या. सार्थकने पण याच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावे, अशी त्यांची इच्छा होती. याच अनुषंगाने कात्रजमधील मांगडेवाडी येथील ‘आर. एस मोटर्स’ या त्यांच्या वर्कशॉपमध्ये सार्थकने सराव सुरू केला.
अवघ्या सहा वर्षांचा असताना २०१२ मध्ये मुंबईतील ‘आयलंड रेस’ स्पर्धेत सार्थकने आठ वर्षांच्या खालील वयोगटात तिसरा क्रमांक पटकाविला. त्यानंतर सार्थकने राष्ट्रीय स्तरावर अनेक ‘डर्ट ट्रॅक’ आणि ‘रोड रेस’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. कॅम्प ‘येथील रोझरी हायस्कूल येथे सार्थकने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नऱ्हे येथील ‘भिवराबाई सावंत अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात’ सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
सार्थकच्या या यशामुळे ‘एमआरएफ’ आणि ‘टीव्हीएस’ या कंपन्यांनी त्यांच्या दुचाकी शर्यत संघात त्याची निवड केली. त्यानंतर २०२२ ते २४ या कालावधीत सार्थकने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड येथील स्पर्धांत तसेच, चेन्नई येथील ‘इंडियन नॅशनल मोटोसायकल रेसिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत यश मिळविले. त्यामुळे त्याला आता अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ‘ऑफर्स’ येत आहेत.
पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये प्रभावी कामगिरी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठीचा परवाना सार्थकला मिळाल्यानंतर अमेरिकेतील जॉर्जिया येथे ‘मिलिसेप्स ट्रेनिंग फॅसिलिटी’मध्ये एका महिन्याचे प्रशिक्षण २०१५ मध्ये त्याने घेतले. त्यानंतर दुबई येथे २०१७ मध्ये आयोजित ‘मोटोक्रॉस रेस’ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. २०१९ मध्ये ‘फिलिपिन्स’ येथे ‘आशिया मोटोक्रॉस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सार्थकने सातवा क्रमांक मिळविला आणि पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये पोहचणारा तो पहिला भारतीय ठरला.
सार्थकने इतक्या कमी वयात जे यश मिळविले आहे. त्याचा मला अभिमान आहे. दुचाकी शर्यतीच्या क्षेत्रात त्याने देशाचा नावलौकिक वाढवावा आणि या क्षेत्रात अतुलनीय यश मिळवावे, हे माझे स्वप्न आहे.
– श्रीकांत चव्हाण, सार्थकचे वडील
माझ्या आयुष्याला योग्य वळण देण्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि विशेष करून माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. आगामी काळात ‘आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘मोटोजीपी-३’ सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून देशाची प्रतिष्ठा वाढविण्यात आपले योगदान द्यायचे आहे.
– सार्थक चव्हाण, व्यावसायिक मोटारसायकलपटू