TOP Newsताज्या घडामोडीपुणे

गुंड गजा मारणेसह १४ साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई; शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण

पुणे : शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी दिले.

या प्रकरणी गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात चौघांना अटक करण्यात आली आहे. गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. खंडणी विराेधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी मारणेसह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पाेलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन मारणे टोळीच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.
खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेने साथीदारांसह नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून काेथरुडपर्यंत रॅली काढली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मारणे आणि साथीदार दहशत माजविली होती. या प्रकरणी मारणे याच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मारणेला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. मार्च महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर मारणे टोळीने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button