Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गणपती विसर्जन मिरवणुकीला लकडी पुलावरील मेट्रो पूलाचा अडथळा – आबा बागुल

पुणे – पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला लकडी पूलावरील मेट्रो पूल अडथळा ठरणार असून या संदर्भात तत्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात मागील व यंदाच्या वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने अटी व शर्ती दिलेल्या असून कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक यात विसर्जन मिरवणुकीस अनन्य महत्व आहे. विसर्जन मिरवणुकीत मोठे आकर्षक रथ, विद्युत रोषणाई, समाजास प्रबोधन व मार्गदर्शन करणारे देखावे, कलाकारांना व्यासपीठ उलब्ध करणारे देखावे अशी सजावट गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठया उत्साहाने करून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता याठिकाणाहून विसर्जन करण्यास अलका चौक येथून मिरवणूक घेवून येतात. अलका चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचे उर्वरित गणपती व शेकडो गणेश मंडळांच्या मिरवणुका लकडी पुलावरून खंडूजी बाबा चौक येथील विसर्जन घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करतात.

कर्वे रस्यावरून एस. एम. जोशी पूलमार्गे तसेच गोखले रस्ता व अन्य रस्ते येथून गणेश मंडळे परत जातात. कर्वे रस्त्यावर देखील मेट्रोचे स्टेशन झालेले असून याठिकाणाहून जाताना अडथळा निर्माण होणार आहे. विसर्जन मिरवणुकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण 35 फुट ते 45 फुटांपर्यंत असते. पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण जगभरातून बघितले जाते. परदेशातून नागरिक खास पुणे शहराची विसर्जन मिरवणूक बघण्यास येतात.

पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम सुरू आहे. हा पूल लकडी पुलापासून 5.45 ते 6 मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे 20 फूट इतका उंच लकडी पुलावरून मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरणुकीस मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. याबाबत असंख्य गणेश भक्तांनी आमच्याकडे याविषयी तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.

श्रींचे विसर्जन मिरवणूक हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय असल्याने सदर विषयी विचार विनिमय करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही परंपरा थांबविता येणार नाही व विसर्जन मिरवणुकीस अडथळा होत असल्यास यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी, महापालिका प्रशासन व पक्षनेते यांची बैठक तत्काळ बोलवावी, अशी मागणी आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button