संत साई शाळेत ‘मातृ-पितृ दिन’ संस्कारमय वातावरणात संपन्न

पिंपरी-चिंचवड : संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मातृ-पितृ दिन’ हा संस्कारक्षम उपक्रम अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजनाची परंपरा जपणारा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत सातत्याने राबविला जात आहे.
हेही वाचा : सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ‘पवनाथडी जत्रा’
“सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमयः पिता” या मंत्रोच्चारांच्या पार्श्वभूमीवर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे विधिवत औक्षण करून, पायावर हळदी-कुंकू लावून, फुले अर्पण करत पूजन केले. धार्मिक मंत्रोच्चार, प्रदक्षिणा आणि आशिर्वाद या विधींमुळे शाळेचा परिसर संस्कार, श्रद्धा आणि भावनिक क्षणांनी भारावून गेला. पालकांनी आपल्या मुलांना प्रेमाने कवेत घेतलेला क्षण अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.


यावेळी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवडचे संयोजक अजित जगताप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी, आई-वडिलांचे स्थान आयुष्यात सर्वोच्च असून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त करणे हाच खरा संस्कार असल्याचे मत व्यक्त केले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांनी, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनीही शाळेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे मोल विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे ही काळाची गरज असल्याचे शिक्षकांनी नमूद केले. मनःशक्तीवर आधारित मंत्रोच्चारांसह सूत्रसंचालन श्वेता नारायणगावकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली खोल्लम, मालन लिगाडे, रिया पोतदार, मनोज वाबळे यांचे सहकार्य लाभले. तसेच विश्वस्त पायल ढवळेश्वर तसेच पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
हा मातृ-पितृ दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही आयुष्यभर लक्षात राहणारा, संस्कार आणि कुटुंबमूल्यांची जाणीव करून देणारा ठरला.
आई-वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले गुरु असून त्यांच्यापासूनच संस्कारांची खरी सुरुवात होते. केवळ पुस्तकी शिक्षण देणे हा शिक्षणाचा उद्देश नसून, विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, नम्रता, आदर आणि संस्कृतीची जाणीव निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे. मातृ-पितृ पूजनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर आयुष्यभर टिकणारे संस्कार घडवतात. पालक आणि शाळा यांनी एकत्र येऊन संस्कारक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
-शिवलिंग ढवळेश्वर,संस्थापक अध्यक्ष,संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल




