मांडूळ जातीचा साप बाळगणारा अटकेत
![Mandul snake owner arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/CRIME-AND-ARREST-1.jpg)
मांडूळ जातीचा साप विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास चंदननगर पोलिसांनी पकडले. खराडी भागात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून मांडूळ जातीचा साप ताब्यात घेण्यात आला. अक्षय बाबू पटेल (वय २१, रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
खराडीतील जलशुद्धीकरण प्रकल्प येथे एकजण मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या चंदननगर पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पटेल एक लाख रुपयांना मांडूळ जातीच्या सापाची विक्री करणार होता. वन्यजीव कायद्यान्वये पटेलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, शेखर शिंदे आदींनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेला साप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अंधश्रद्धेपोटी मांडुळाला मागणी
अंधश्रद्धेपोटी मांडूळ जातीच्या सापाला मागणी असते. मांडूळ बाळगल्यास धनप्राप्ती होते, अशी अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेपोटी मांडूळ बाळगला जातो. त्यासाठी मोठी किंमत मोजली जाते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.