‘तीर्थक्षेत्र विकासकामांची गुणवत्ता राखा’; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

पुणे : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आराखड्यानुसार मंजूर असलेली सर्व कामे गुणवत्ता राखून तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास आराखडा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डुडी बोलत होते. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वढू बु. व तुळापूर, मालोजी राजे भोसले यांची गढी , श्रीक्षेत्र जेजुरी गड, सुदुंबरे येथील श्रीसंत जगनाडे महाराज समाधी स्थळ, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करणे श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या सर्व आराखड्यांच्या विकास कामांच्या प्रगती बाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.
हेही वाचा – गॅस सिलिंडरच्या दरात वाढ कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासंदर्भात मंदिर ट्रस्ट, संस्थान येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची मदत घेऊन कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतील त्या प्रशासनातर्फे सोडण्यात येतील, काही ठिकाणी जमीन संपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करावी.
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठीच्या आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उत्कृष्ट असल्या पाहिजे, कामे पूर्ण झाल्यावर त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.