‘मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रच ठरवेल’; आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-22-2-780x470.jpg)
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रच ठरवेल. जनतेला सर्वांचे काम माहिती असून, उद्धव ठाकरे यांचे देखील काम माहिती आहे,असे सूचक वक्तव्य करीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे संकेत दिले.
आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून, त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा – BIG NEWS : पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर नेत्यांची ‘‘व्हाया देवगिरी- सागर बंगल्यावर ‘पॉलिटिकल सेटलमेंट’
पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आलेले आहेत. त्यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे दोन- अडीच वर्षांमध्ये काम केले, ते लोकांसमोर आहे.त्यामुळे त्याबाबत जनता निर्णय घेईल. मात्र, ही निवडणूक आम्ही आमच्यासाठी अथवा कोणत्याही पदासाठी लढत नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, की यापूर्वीही गायकवाड यांनी अनेक अशी आक्षेपार्ह विधाने केली आहेत.
मात्र, या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलाच नाही, असे सध्याचे चित्र आहे. बदलापूर घटनेमध्ये देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. पुण्यात देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सातत्याने गुन्हेगारी कारवाया घडत आहेत. त्यामुळे या राज्याला गृहमंत्रीच नाही, अशी सध्याची स्थिती आहे.