चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; मद्यपी वाहन चालक ताब्यात

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री पुण्यात एका व्यक्तीने दारुच्या नशेत चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत. मात्र अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात जात असताना हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चार चाकी मद्यपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रच ठरवेल’; आदित्य ठाकरे
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सांगितले की, ‘देवदर्शन आणि गणपती मंडळांना भेटीगाठी दिल्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील कोथरुड भागात असलेल्या घरी निघालो होतो. त्यावेळी आशिष गार्डन जवळ रात्री बारा वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने माझी गाडी थोडी पुढे गेली आणि मागे ताफ्यातील गाडीला धडक दिली,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.





