पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्य प्रदेश कनेक्शन समोर; ९ आरोपींसह ७ पिस्तुल जप्त

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. यातच पुण्यात कोयता गँगने देखील दहशत पसरवली आहे. या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता पुण्यातील विविध ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ पिस्तूल जप्त केले आहेत. त्यासोबत जिवंत काडतुसे वापरणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात पकडलेल्या ७ पिस्तूलची किंमत २ लाख ८६ हजार होती, मात्र ती मुख्य आरोपीने इतरांना कितीला विकली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या या नऊ जणांच्या पिस्तूल बाळण्यासाठीचे विविध कारण समोर आले आहेत.
हेही वाचा: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा सरकारचा निर्णय
काही जणांनी जमिनीच्या वादातून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पिस्तूल विकत घेतले, तर काही जणांनी वर्चस्व निर्माण व्हावं, यासाठी या पिस्तूल खरेदी केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. हे सर्व पिस्तूल मध्यप्रदेश मधून कमी किंमतीत आणलं जातात आणि पुढे याची विक्री लाखो रुपयांमध्ये होते.
या प्रकरणात 8 आरोपींसह अटक करण्यात आलेल्या सागर ढेबेवर याआधी पुण्यातील अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळच्या हत्येच्या बदला आणि कोथरूडमध्ये वर्चस्व राहावं यासाठी तरुणांनी जे पिस्तूल आणलं होतं ते सुद्धा मध्य प्रदेश मधूनच आणले होते. यावरुन आता पुण्यात गुन्हेगारांच्या हाती पिस्तूल येण्याचे मध्य प्रदेश कनेक्शन समोर आले आहे.




