#Lockdown: पुण्यात सहा आठवड्यांनंतर पुन्हा सुरू होणार मद्याची दुकानं, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/untitled-38.jpg)
जवळपास सहा आठवड्यांनंतर पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, केवळ ‘कंटेनमेंट झोन’बाहेरील एकल दुकानेच सुरू होतील. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याला दुजोरा दिला. “पुणे जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनबाहेर असलेली एकल दुकानेच पुन्हा सुरू करायला परवानगी असेल. पण, दुकानासमोर पाचपेक्षा अधिक जण थांबणार नाहीत आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केलं जाईल याची खबरदारी विक्रेत्यांना घ्यावी लागेल”, असे जिल्हाधिकारी राम म्हणाले.
पुण्यामध्ये सुमारे 300 देशी दारुची दुकाने वगळता सुमारे 2500 छोटी-मोठी दारूची दुकाने आहेत. यातील केवळ एकल दुकानेच सुरू होणार आहेत. टाळेबंदीची मुदत वाढवताना निर्बंधांमध्ये सवलती देऊ करणाऱ्या राज्य सरकारने गेल्या दोन दिवसांत चार आदेश जारी केले. त्यापैकी शनिवारी काढलेल्या आदेशांत महामुंबई, पुणे महानगर आणि मालेगाव या जास्त रुग्ण असलेल्या शहरांत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज अन्य कशालाही परवानगी न देण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. मात्र, रविवारी या आदेशांत बदल करण्यात आला. रुग्णसंख्येनुसार रेड झोनमध्ये येणाऱ्या या तिन्ही भागांना एकूण रेड झोनमधून वेगळे करण्यात आले. तसेच रेड झोनमधील निर्बंधांपेक्षा अधिक कडक निर्बंध या तिन्ही भागांमध्ये लागू करण्यात आले.
मात्र, त्याचवेळी या भागांतील मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या भागांतील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य भागांत मद्यविक्रीची दुकाने तसेच रस्ते/गल्लीमधील एकल दुकाने खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड या भागांतील इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, स्टेशनरी दुकाने खुली होण्याची आशा निर्माण झाली. पण, एकल दुकाने म्हणजे काय, याबाबत शासकीय स्तरावरच पुरेशी स्पष्टता नाही. वस्तीत किंवा रस्त्यावर एकाठिकाणी लागून पाचपेक्षा अधिक दुकाने नसतील तर ती एकल दुकाने म्हणून मान्य करण्यात आली आहेत. मात्र, कोणते दुकान एकल आहे, हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.