प्रवास ४० मिनिटांचा; विमानतळाबाहेर यायला दोन तास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-12-780x470.jpg)
पुणे : पुणे – नागपूरहून पुण्याला विमानाने येण्यासाठी प्रवाशांना ४० मिनिटे लागली. पुणे विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी मात्र त्यांना तब्बल दोन तास लागले. पार्किंग बे उशिरा मिळाल्याने तसेच एरोमॉलमधील कोंडीमुळे प्रवाशांना शनिवारी मध्यरात्री मनस्ताप सहन करावा लागला.
नागपूर-पुणे इंडिगो विमान (६इ८३५) रात्री ११.२० वाजता झेपावले आणि १२ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर दाखल झाले. पार्किंग बे उपलब्ध नसल्याने विमानाला आणि पर्यायाने प्रवाशांना एक तास वाट पहावी लागली. अखेर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार्किंग बे उपलब्ध झाला. त्यानंतर प्रवासी विमानातून खाली उतरले. मग एरोमॉलमधील स्थिती अशीच होती. तेथे रांगा लागल्या होत्या.
अनेक जण कॅबच्या प्रतीक्षेत होते, तर इतर अनेक जण मॉलमधील कोंडीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. एरोमॉलमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा आणखी एक तास खर्ची पडला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीची असली तरी असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. विमानतळ प्रशासनाच्या या कारभाराविषयी अनेकांनी ‘एक्स’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुमारे १२० कोटी रुपये खर्चून मल्टी लेव्हल कार पार्किंग (एरोमॉल) बांधले. एक हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता असलेल्या या एरोमॉलमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टर्मिनलमधून बाहेर पडल्यानंतर प्रवासी पादचारी पुलावरून एरोमॉलच्या दुसऱ्या मजल्यावर येतात. तेथून कॅबची सोय उपलब्ध आहे, मात्र कॅब सेवेचा बोजवारा उडाला आहे.
सामान, लहान मुलांना घेऊन आलेल्या प्रवाशांना कॅब बुक करण्यासाठीही बरीच वाट पहावी लागते. कॅब बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने कोंडी झालेली असते. टर्मिनलमध्ये प्रवाशांना अनेक पायभूत सुविधा मिळत नाहीत. तशीच स्थिती एरोमॉलमध्येही असल्याने विमानतळ प्रशासनाच्या कारभाराविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एरोमॉल प्रवाशांसाठी बांधण्यात आले असले तरी पार्किंगच्या सुविधेपेक्षा विमानतळ प्रशासनाचे जास्त लक्ष व्यावसायिक वापरासाठी दिलेल्या जागांवर आहे. खाद्यपदार्थ व तसेच कपड्यांच्या दुकानांच्या भाड्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्या तुलनेत कॅब व रिक्षांना वापरासाठी दिलेल्या जागेतून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेली कॅब सेवेचा बोजवारा उडाला आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विमानतळ संचालक संतोष ढोके व एरोमॉलचे उपाध्यक्ष व्ही. आर. रजपूत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने केला, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही.